-सेंद्रिय खताचा केक कापून वाढदिवस साजरा
-ऑटोरिक्षाचालकांची निसर्गाविषयी कृतज्ञता
नागपूर :- प्रत्येकच पालक मुलाचा वाढदिवस साजरा करतात. यात काही नवीन नाही. मात्र, वृक्षाचाही वाढदिवस साजरा होत असेल तर! हो, नागपूर रेल्वेस्थानकावरील दहा वर्षांच्या झालेल्या पिंपळ वृक्षाचा अनोख्या पद्धतीने वाढदिवस साजरा करण्यात आला. वाढदिवसाला झाडांचे खाद्य म्हणून सेंद्रिय खताचा केक कापण्यात आला. निसर्गाविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी लोकसेवा ऑटोचालक संघटनेतर्फे बुधवारी सकाळी या वृक्षाचा दहावा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला.
सर्व वृक्षांपैकी 24 तास ऑक्सिजन देणारे वृक्ष म्हणून पिंपळ ओळखले जाते. इतर झाडे रात्री कार्बन डायऑक्साईड किंवा नायट्रेट सोडतात. पिंपळाचे झाड सूर्याची उष्णता थांबवते, पण त्याचा प्रकाश थांबवीत नाही. झाडाच्या सावलीत प्रवाशांना थांबता यावे या उद्देशाने दहा वर्षांपूर्वी पिंपळ वृक्षाचे रोपण करण्यात आले.
मध्यवर्ती नागपूर रेल्वेस्थानकावर ऑटोचालक- मालक संघटनेतर्फे प्रवाशांना प्री-पेड सेवा देण्यात येते. अनेक दशकांपासून ऑटोचालक येथे आहेत. प्रवाशांना केंद्रस्थानी मानून अनेक उपक्रम राबवितात तसेच निसर्गाविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी वृक्षारोपणही करण्यात आले. बुधवारी सकाळी संघटनेचे अध्यक्ष अल्ताफ अंसारी यांच्या कल्पकतेने प्री-पेड बूथ परिसरातील पिंपळ वृक्षाचा अनोख्या पद्धतीने वाढदिवस साजरा करण्यात आला.
यावेळी झाडाच्या परिसरात साफसफाई करण्यात आली. यासोबतच झाडाभोवती सुंदर रांगोळ्या काढण्यात आल्या. रंगीबेरंगी फुगे व आकर्षक रांगोळ्या रेल्वे स्थानकावर येणार्या प्रत्येकाचे लक्ष वेधून घेत होत्या. मानव वाढदिवसाला जसा केक कापून खातो, त्याप्रमाणे वृक्षाच्या वाढदिवसाला झाडांचे खाद्य म्हणून सेंद्रिय खताचा केक कापण्यात आला. ही अनोखी पद्धत सार्यांनाच भावून गेली.
याप्रसंगी अल्ताफ अंसारी, परवीन बनारसे, रवी वालदे, श्याम धमगाये, नरेश कुस्तकर, आशिफ अली, शरीफ, शेख ईसाद, जाकीर अली, दशरथ जहरिल्ले यांच्यासह ऑटोचालकांची उपस्थिती होती.