-आरपीएफ गुन्हे शाखेच्या पथकाने सिनेस्टाईल ठेवली पाळत
नागपूर :- पैशासाठी एका व्यक्तीची हत्या केली. धारदार शस्त्राने मृतदेहाचे तुकडे केले. पोत्यात भरले आणि नदीत फेकले. मृतदेहाची विल्हेवाट लावल्यानंतर आरोपी पळाले. दोघेही नागपूर रेल्वे स्थानकावर भटकत असताना आरपीएफ आणि गुन्हे शाखेच्या पथकाने घेराव करून दोघांच्याही मुसक्या आवळल्या. रजनीश पांडे (30), रा. दुर्ग, अनुज तिवारी (19), रा. रिवा अशी आरोपींची नावे आहेत. आरपीएफ पथकाने भिलाई (छत्तीसगड) येथील हत्याकांडाचा छडा लावला. दोन्ही आरोपींना भिलाई पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
ओमप्रकाश साहू हत्याकांडाचा भिलाई पोलिसांनी तांत्रिक तपास केला असता दोन्ही आरोपींचे लोकेशन नागपूर दाखवत होते. लगेच पोलिस अधिकार्यांनी मध्य रेल्वेचे वरिष्ठ सुरक्षा आयुक्त आशुतोष पांडे यांच्याशी संपर्क साधला. पांडे यांनी गुन्हे शाखेचे निरीक्षक नवीन प्रतास सिंग, आरपीएफ निरीक्षक आर. एल. मीना यांच्या नेतृत्वात एक पथक तयार केले. या पथकात एएसआय आ. के. भारती, मुकेश राठोड, भुपेंद्र बाथरी, जसबिर सिंग, कपिल जहारबादे, अजन सिंह, गोवर्धन सवई यांच्या पथकाने आरोपीच्या मुसक्या आवळल्या. रेल्वे स्थानका समोरील एका मोबाईलच्या दुकानात मोबाईल आणि सिम खरेदी करीत असताना त्यांची ओळख पटली. मात्र, छायाचित्रानुसार त्यांनी आपल्या चेहर्यात बदल करून घेतला होता. पथकाने घेराव करून दोघांनाही अटक केली. दुर्गचे पोलिस अधीक्षक यांनी एक पथक नागपुरात पाठविले. आरपीएफने दोन्ही आरोपींना दुर्ग पथकाच्या ताब्यात दिले.
असा आहे घटनाक्रम
ओमप्रकाश साहू असे मृताचे नाव आहे. रजणिश आणि अनूज हे दोघे अट्टल गुन्हेगार असून त्यांनी खंडणीसाठी सुपारी घेऊन हे निर्घृण हत्याकांड घडवून आणले. आयपीएल सामन्यावरून मृतक आणि संशयीत आरोपीत पैशावरून फाटले. वाद वाढतच गेला. दरम्यान ओमप्रकाशच्या हत्येची योजना आखली. रजणिश आणि अनुजने त्याच्या हत्येची सुपारी घेतली. 31 मे च्या रात्री आरोपींनी ओमप्रकाशचे अपहरण करून त्याची हत्या केली. मृतदेहाचे तुकडे करुन नदीत फेकले. तत्पूर्वी त्याच्या पत्नीला खंडणीची मागणी केली. दरम्यान 1 जूनला ओमप्रकाशची पत्नी विमला साहूने भिलाई ठाण्यात तक्रार नोंदवली.