विशेष ऑलिम्पिकसाठी जाणाऱ्या बौद्धिक दिव्यांग खेळाडूंना राज्यपालांच्या शुभेच्छा

मुंबई :- बर्लिन येथे १७ ते २५ जून या कालावधीत होत असलेल्या बौद्धिक दिव्यांग खेळाडूंच्या ‘स्पेशल ऑलिम्पिक’ मध्ये महाराष्ट्रातून जात असलेल्या खेळाडू व प्रशिक्षकांना राज्यपाल रमेश बैस यांनी शुक्रवारी (दि. २) राजभवन येथे निमंत्रित करून स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.           यावेळी पर्यटन, कौशल्य विकास, महिला व बालविकास मंत्री मंगल प्रभात लोढा, ‘स्पेशल ऑलिम्पिक्स भारत’ च्या अध्यक्ष डॉ. मल्लिका नड्डा तसेच विशेष ऑलिम्पिक महाराष्ट्रच्या अध्यक्ष डॉ. मेधा सोमैया उपस्थित होत्या.

बर्लिन हे भारतासाठी भाग्यवान शहर आहे. या ठिकाणी हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांनी देशाला १९३६ साली सुवर्णपदक मिळवून दिले होते, याचे स्मरण करुन बौद्धिक दिव्यांग खेळाडू विशेष ऑलिम्पिकमध्ये देशासाठी पदकांची लयलूट करतील अशी आशा राज्यपालांनी यावेळी व्यक्त केली. देशभरात ‘विशेष ऑलिम्पिक भारत’ या संघटनेतर्फे दिव्यांग खेळाडूंसाठी ७५० क्रीडा केंद्र उभारले जाणार आहे, ही आनंदाची बाब असल्याचे सांगून पदके जिंकून मायदेशी परत आल्यावर खेळाडूंचे भव्य स्वागत करण्यात येईल, असे राज्यपालांनी सांगितले.

संसदीय समितीचे अध्यक्ष असताना दिव्यांग लोकांसाठी विधेयक तयार केले होते असे सांगून कायद्यामध्ये दिव्यांगांसाठी २ टक्के नोकऱ्या आरक्षित करण्याची तरतूद असून त्याची अंमलबजावणी करणे आवश्यक असल्याचे राज्यपालांनी सांगितले.

राज्यपालांनी बौद्धिकदृष्ट्या दिव्यांग खेळाडूंना ऑलिम्पिकसाठी शुभेच्छा दिल्यामुळे संपूर्ण चमूचे मनोबल उंचावेल असे सांगून ऑलिम्पिकमध्ये पदक प्राप्त करणाऱ्या खेळाडूंचा राज्य शासनातर्फे यथायोग्य सन्मान होईल, याचा पाठपुरावा करण्यात येईल, असे मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी सांगितले.

शासनाने दिव्यांग खेळाडूंना रोजगार उपलब्ध करून द्यावा – डॉ. मल्लिका नड्डा

भारतातील बौद्धिक दिव्यांग खेळाडूंनी विशेष ऑलिम्पिकमध्ये आजपर्यंत १२०० पदके प्राप्त केली असून बर्लिन येथे होणाऱ्या विशेष ऑलिम्पिकमध्ये १९० देशातून ७ हजार खेळाडू सहभागी होत असल्याचे विशेष ऑलिम्पिक भारतच्या अध्यक्ष डॉ. मल्लिका नड्डा यांनी यावेळी सांगितले. बर्लिन विशेष ऑलिम्पिक स्पर्धेत देशभरातून १९८ खेळाडूंसह ३०० जण सहभागी होत असल्याचे त्यांनी सांगितले. बौद्धिकदृष्ट्या दिव्यांगांना सन्मानाने जगता यावे याकरिता त्यांना राज्य शासनाने रोजगार देण्याचा प्रयत्न करावा तसेच केंद्र सरकारप्रमाणे राज्याने देखील पदक विजेत्या खेळाडूंना पुरस्काराची भरीव रक्कम जाहीर करावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

यावेळी संघाच्या व्यवस्थापिक हंसिनी राऊत, उपाध्यक्ष परवीन दासगुप्ता तसेच संस्थेचे पदाधिकारी व माजी खेळाडू उपस्थित होते. राज्यपालांच्या हस्ते सर्व खेळाडू व प्रशिक्षकांना ट्रॅक सूट देण्यात आला.

विशेष ऑलिम्पिक स्पर्धेत महाराष्ट्रातून १४ बौद्धिक दिव्यांग खेळाडू व ५ प्रशिक्षक जाणार असून त्यापैकी १६ महिला असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

मुंबईत दिव्यांग आणि महिलांना सुसंगत रोजगार उपलब्ध करून देणार - पालकमंत्री दीपक केसरकर

Sat Jun 3 , 2023
‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमात साधला ‘जनतेशी सुसंवाद’ मुंबई :- मुंबईतील धारावी परिसरात सुमारे 250 दिव्यांग एका छताखाली आहेत. त्यांना धारावीत शिबीर आयोजित करून त्यांच्यासाठी सुसंगत असलेल्या योजनांचा लाभ मिळवून द्यावा, असे निर्देश शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ‘जी उत्तर’ विभागातील रहिवाशांच्या विविध समस्या जाणून त्या जागेवरच सोडविण्यासाठी पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!