– छत्रपती शिवाजी स्मारक समितीने कुलगुरूंना दिले निमंत्रण
नागपूर :- राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या जागेवर छत्रपती शिवाजी महाराज यांचा सिंहासनारूढ भव्य पुतळा उभारला जात आहे. महाराज बाग चौक येथील विद्यापीठाच्या छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय परिसरात उभारल्या जाणाऱ्या पुतळा स्थळाचे भूमिपूजन रविवार, दिनांक १८ जून २०२३ रोजी प्रस्तावित करण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समितीने या भूमिपूजन कार्यक्रमाचे निमंत्रण माननीय कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांना बुधवारी (२४ मे ) दिले.
छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समितीचे अध्यक्ष डॉ. राजे मुधोजी भोसले, विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. समय बनसोड, कुलसचिव डॉ. राजू हिवसे, समितीचे उपाध्यक्ष शेखर सावरबांधे, सचिव मंगेश डुके, सहसचिव तथा विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ. प्रशांत कडू, कोषाध्यक्ष विजयकुमार शिंदे, समितीचे पदसिद्ध सदस्य तथा विद्यापीठ विद्यार्थी विकास विभाग संचालक डॉ. मंगेश पाठक यांच्यासह अन्य उपस्थित होते. भूमिपूजन कार्यक्रमाचे समितीने दिलेले निमंत्रण माननीय कुलगुरु डॉ. सुभाष चौधरी यांनी स्वीकारले.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या महाराज बाग चौक नागपूर येथील छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय परिसरात छत्रपती शिवाजी महाराज यांचा सिंहासनारूढ पुतळा उभारण्यास विद्यापीठाची मंजुरी प्राप्त झाली आहे. यासाठी छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समिती स्थापन करण्यात आली आहे. लोकवर्गणीतून उभारण्यात येत असलेला या पुतळ्याच्या कामासाठी आवश्यक असलेल्या परवानग्यांपैकी हेरिटेज संवर्धन समिती, महापालिका नागपूर, पोलिस आयुक्त कार्यालय, राष्ट्रीय महामार्ग विभाग तसेच महाराष्ट्र राज्याचे कला संचलनालय विभाग आदी विभागाच्या परवानगी प्राप्त झाल्या आहेत.