‘नागपूर व्हॉईस’ व्दारे नागपुरकरांचा आवाज वैश्विक पटलावर येणार-डॉ. विनय सहस्त्रबुद्धे
नागपूर : जी-20 परिषदेअंतर्गत सिव्हील सोसायटी अर्थात सी-20 चे आयोजन शहरात 20 ते 22 मार्च 2023 दरम्यान करण्यात आले आहे. विविध सामाजिक विषयांवर चर्चा व मंथन घडून येणाऱ्या या आयोजनासाठी नागपुरकरांचे पूर्ण सहकार्य लाभेल, असा विश्वास भारतीय सांस्कृतिक परिषदेचे अध्यक्ष तथा सी-२० सचिवालयाचे संरक्षक डॉ. विनय सहस्त्रबुद्धे यांनी आज येथे पत्रकार परिषदेत व्यकत् केला. आयोजनातील ‘नागपूर व्हॉईस’ या उपक्रमाद्वारे नागपूर व विदर्भातील स्वयंसेवी संस्थांना वैश्विक पटलावर मत मांडण्याची संधीही उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
जी-20 परिषदेचे अध्यक्षपद असणाऱ्या भारत देशात वर्षभर विविध एंगेजमेंट गृपचे आयोजन होत असून यापैकी एक असलेल्या सी-20 गृपच्या प्रारंभिक परिषदेचे आयोजन नागपुरात होत आहे. या आयोजनाबाबत माहिती देण्यासाठी प्रेस क्लब येथे डॉ. सहस्त्रबुद्धे यांनी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना संबोधित केले. रामभाऊ म्हाळगी प्रबोधनीचे कार्यकारी संचालक कुलकर्णी, सी-20 अयोजन समीतीचे शुशेरपा डॉ. स्वदेश सिंह आणि पंकज गौतम आदी यावेळी उपस्थित होते.
20 मार्चला सी-20 चे उद्घाटन
शहरातील रॅडिसन ब्लु हॉटेलमध्ये सी-20 चे आयोजन करण्यात आले असून 20 मार्च रोजी दुपारी 3 वा. या परिषदेचे उद्घाटन होणार आहे. सामाजिक तथा अध्यात्मिक नेत्या माता अमृतानंदमयी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणाऱ्या या सोहळ्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जी-20 साठी भारताचे शेरपा डॉ अमिताभ कांत, संयुक्त राष्ट्रसंघाचे भारतातील प्रतिनिधी शैामी शाह, इंडोनेशिया आणि ब्राझीलचे जी-20 शेरपा यांची प्रमुख उपस्थिती राहणार असल्याचे डॉ. सहस्त्रबुद्धे यांनी सांगितले.
उद्घाटनानंतर सलग दोन दिवस सी-20 साठी तयार करण्यात आलेल्या अजेंड्यासह जगभरातील स्वयंसेवी संस्थांसमोरील आव्हाने व त्यावरील उपाय याबाबत चर्चा व मंथन होणार आहे. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत 21 मार्च रोजी या परिषदेचा समारोप होणार आहे.
देश-विदेशातील जवळपास 250 प्रतिनिधींचा सहभाग
जी-20 देशांचे सदस्य असणारे सी-20 चे देशांचे जवळपास 60 प्रतिनिधी आणि भारतातील विविध नागरी संस्थां व आमंत्रित देशाचे असे जवळपास 250 प्रतिनिधी या परिषदेत सहभागी होणार आहेत.
‘नागपूर व्हॉईस’ द्वारे वैश्विक पटलावर विचार मांडण्याची संधी
सी-20 परिषदेच्या आयोजना दरम्यान विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. यामध्ये ‘नागपूर व्हॉईस’ हा अनोखा उपक्रम असणार आहे. नागपूर व विदर्भात विविध सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या नागरी संस्थांना या उपक्रमाअंतर्गत आपले विचार मांडता येणार आहेत. या संस्थांना सी-20 च्या अध्यक्ष माता अमृतानंदमयी यांच्याकडे निवेदन स्वरुपात आपल्या समस्या, सूचना आदी मांडता येणार आहेत. नागरी संस्थांना या निमित्ताने वैश्विक पटलावर आपले मत मांडण्याची संधी प्राप्त होणार असून जास्तीत जास्त संस्थांनी यात सहभाग नोंदवावा असे आवाहनही डॉ. सहस्त्रबुद्धे यांनी केले.
शहरात सी-20 चे उद्यान
जी-20 या जागतिक परिषदेअंतर्गत होत असलेल्या सी-20 परिषदेच्या नागपुरातील महत्वाच्या आयोजनाच्या स्मृती कायमस्वरुपी राहाव्यात म्हणून शहरात सी-20 उद्यान उभारण्यात येणार आहे. सी-20 परिषदेच्या समारोपानंतर 22 मार्च रोजी या परिषदेतील प्रतिनिधींच्याहस्ते या उद्यानात वृक्षारोपण करण्यात येणार आहे. या उद्यानात सी-20 च्या बोधचिन्हाच्या आकारात वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. परिषदेत सहभागी देशांचे वृक्ष आणि ध्वज या स्वरुपात या उद्यानात वृक्ष लागवड करण्यात येणार असल्याचे डॉ. सहस्त्रबुद्धे यांनी सांगितले.
22 मार्च रोजी सी-20 मध्ये सहभागी होणारे प्रतिनिधी देवलापार येथील गौ-संशोधन केंद्र तसेच पेंच व्याघ्रप्रकल्पास भेट देणार आहेत. 23 मार्च रोजी हे प्रतिनिधी वर्धा जिल्ह्यातील सेवाग्राम आणि पवनार आश्रमाला भेट देणार आहेत.
जी-20 विषयी
1999 मध्ये आलेल्या जागतिक आर्थिक मंदीच्या पार्श्वभूमीवर जी-20 किंवा गृप ऑफ 20 हा 19 देश आणि युरोपियन युनियन या देशांचा एक आंतरराष्ट्रीय गट स्थापन झाला. जी-20 राष्ट्रांच्या नेत्यांची वर्षातून एकदा बैठक घेण्याचा निर्णय घेण्यात आला. जी-20ची शिखर परिषद ही चक्राकार पध्दतीने निवड झालेल्या सदस्य राष्ट्रांच्या नेतृत्वाखाली दरवर्षी त्या-त्या देशात आयोजित केली जाते. या वर्षी भारताकडे जी-20 शिखर परिषदेचे यजमानपद आहे. देशातील विविध शहरांमध्ये याअनुषंगाने जी-20 च्या विविध एंगेजमेंट गृपच्या परिषदांचे आयोजन होत आहे. याचाच एक भाग म्हणून सी-20 या एंगेजमेंट गृपची प्रारंभिक परिषद नागपुरमध्ये होत आहे.
सी-20 विषयी
जी-20 मध्ये नागरी समाज संस्थांच्या सहभागाची सुरुवात 2010 मध्येच झाली होती. मात्र जी-20 चा एंगेजमेंट गृप म्हणून सी-20 ची अधिकृत स्थापणा 2013 मध्ये करण्यात आली. ‘सी-20’ हा गट सामाजिक विकास, मानवी हक्क आणि लैंगिक समानता यासह विविध विषयांवर जागतिक धोरणे आखण्यासाठी जी-20 ला शिफारशी देतो. जगभरातील अशासकीय व सेवाभावी नागरी समाज संस्थांचे म्हणणे मांडण्यासाठी सी-20 हा हक्काचा जागतिक मंच आहे.