नवी दिल्ली :-राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज (23 फेब्रुवारी 2023) नवी दिल्ली येथे वर्ष 2019, 2020 आणि 2021 साठी संगीत नाटक अकादमीची शिष्यवृत्ती (अकादमी रत्न) आणि संगीत नाटक अकादमी पुरस्कार प्रदान केले.
मानवी सभ्यता किंवा संस्कृती एखाद्या राष्ट्राची भौतिक कामगिरी दर्शवते परंतु अमूर्त वारसा त्याच्या सांस्कृतिक वारशातूनच प्रकट होतो. सांस्कृतिक वारसा हीच देशाची खरी ओळख असते. भारताच्या अनोख्या सादरीकरण कलांनी शतकानुशतके आपली अतुलनीय संस्कृती जिवंत ठेवली आहे. आपल्या कला आणि कलाकार हे आपल्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे वाहक आहेत. ‘विविधतेत एकता’ हे आपल्या सांस्कृतिक परंपरांचे सर्वात मोठे वैशिष्ट्य आहे असे राष्ट्रपतींनी यावेळी सांगितले.
आपल्या परंपरेत कला ही एक आध्यात्मिक साधना आहे, सत्याच्या शोधाचे, प्रार्थना आणि उपासनेचे,लोककल्याणाचे हे माध्यम आहे. सामूहिक उत्साह आणि एकता देखील नृत्य आणि संगीताद्वारे अभिव्यक्तीचा शोध घेते. कला भाषिक वैविध्य आणि प्रादेशिक वैशिष्ट्ये एकाच धाग्यात गुंफते.
कलेची सर्वात प्राचीन आणि सर्वोत्तम व्याख्या तसेच परंपरा आपल्या देशात विकसित झाल्या आहेत याचा आपल्याला अभिमान वाटायला हवा. आधुनिक युगात आपली सांस्कृतिक मूल्ये अधिक उपयुक्त झाली आहेत. तणाव आणि संघर्षाच्या आजच्या काळात, भारतीय कला शांतता आणि सौहार्द पसरवू शकतात. भारतीय कला हे भारताच्या सॉफ्ट पॉवरचे उत्तम उदाहरण आहे असे राष्ट्रपती म्हणाल्या.
निसर्गाची देणगी असलेले हवा आणि पाणी ज्याप्रकारे मानवी मर्यादांमधे अडकत नाहीत, त्याचप्रमाणे कला प्रकारही भाषा आणि भौगोलिक सीमांच्या पलिकडे आहेत असे राष्ट्रपती म्हणाल्या. एम.एस. सुब्बुलक्ष्मी, पंडित रविशंकर, उस्ताद बिस्मिल्ला खान, लता मंगेशकर, पंडित भीमसेन जोशी आणि भूपेन हजारिका यांच्या संगीताला भाषा किंवा भूगोलाच्या सीमा नाहीत. आपल्या अजरामर संगीताने त्यांनी केवळ भारतातीलच नव्हे तर जगभरातील संगीतप्रेमींसाठी एक अनमोल वारसा मागे सोडला आहे.