– दारूच्या तस्करीत महिला अटक
– नागपूर रेल्वे स्थानकावर कारवाई
नागपूर :-पोलिस कारवाईपासून वाचण्यासाठी ती एका कोचमधून दुसर्या डब्यात चढत असतानाच आरपीएफ गुन्हे शाखेच्या जाळ्यात अडकली. चौकशीत दारूची तस्करी करीत असल्याचे स्पष्ट झाले. राणी गब्बर (43), रा. वर्धा असे तस्करीत अडकलेल्या महिलेचे नाव आहे. ही कारवाई सोमवार 20 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजताच्या सुमारास नागपूर रेल्वे स्थानकावर करण्यात आली.
होळीला केवळ दोन आठवडे शिल्लक आहेत. त्यासाठी अवैध दारू विक्रेते आतापासूनच दारूसाठा करून ठेवण्यासाठी कामाला लागले. आरपीएफ गुन्हे शाखेचे निरीक्षक नवीन प्रसाद सिंग यांनी अंमली पदार्थाच्या तस्करीवर आळा घालण्यासाठी एक पथक तयार केले. या पथकात आरपीएफ गुन्हे शाखेचे आरक्षक जसवीर सिंह, सागर लाखे, अजय सिंह यांचा समावेश आहे.
गुन्हे शाखेचे पथक सोमवारी सकाळपासूनच गस्तीवर होते. तस्कर महिलेने पांढुर्णा, मध्यप्रदेश येथून दारू खरेदी केली. दिल्ली-चेन्नई जीटी एक्सप्रेसने ती वर्धेसाठी निघाली. तिच्याकडे रेल्वेचे तिकीट नव्हते. त्यामुळे ती शौचालयाजवळ बसली होती. प्रवासादरम्यान आपल्यावर पोलिसांची नजर आहे, अशी भीती तिला वाटली, नागपूर रेल्वे स्थानकावर गाडी थांबताच ती स्लीपर कोच मधून उतरली. तिच्या जवळ एक ट्राली बॅग, एक वजनी स्कुल बॅग होती. तसेच तिने संपूर्ण चेहरा कापडाने झाकलेला होता. ती जनरल कोच मध्ये चढण्याच्या प्रयत्नात होती. चेहरा झाकल्याने जसवीर सिंह आणि अजय सिंह यांचा संशय बळावला. त्यांनी महिलेची विचारपूस केली. मात्र, तिने समाधानकारक उत्तर दिले नाही. त्यामुळे संशय अधिकच बळावला. तिच्याकडील दोन्ही बॅगची झडती घेतली असता त्यात 28 हजार रुपये किंमतीच्या 382 बाटल्या आढळल्या. गुन्हे शाखेत आणून तिची सखोल चौकशी केली. गुन्हे शाखेच्या चौकशीत बंदी असलेल्या वर्धा जिल्ह्यात दारूची तस्करी करीत असल्याचे निष्पन्न झाले. कायदेशिर कारवाई नंतर संपूर्ण मुद्देमाल राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे पाठविण्यात आला. ही कारवाई गुन्हे शाखेचे निरीक्षक एन.पी. सिंग यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली.
@ फाईल फोटो