कोल्हापूर :- इंडिया आघाडीचं सरकार आलं तर 5 वर्षांत 5 पंतप्रधान आणणार हा जावईशोध पंतप्रधान मोदींनी कुठून लावला ? असा सवाल विचारत शरद पवार यांनी नरेंद्र मोदींना टोला लागवला. इंडिया आघाडीमध्ये अद्याप पंतप्रधानपदाबाबत कोणतीही चर्चा झालेली नाही. पुरेसे संख्याबळ आल्यावर यासंदर्भात निर्णय घेऊ असे त्यांनी स्पष्ट केले. कोल्हापूरमध्ये माध्यमांशी संवाद साधताना शरद पवार यांनी मोदींवर निशाणा साधला.
सत्ता मिळवण्यासाठी इंडिया आघाडीने आता नवीन फॉर्म्युला तयार केला आहे. दरवर्षी नवीन पंतप्रधान, ५ वर्षात पाच पंतप्रधान आणायची यांची रणनीती आहे, असे पंतप्रधान मोदींनी एका सभेत म्हटले होते. या मुद्यावरून त्यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली होती. त्यांच्या याच विधानाचा समाचार घेताना शरद पवार यांनी मोदींनी टोला लगावला. इंडिया आघाडीमध्ये अद्याप पंतप्रधानपदाबाबत कोणतीही चर्चा झालेली नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. पंतप्रधानपदाबाबत आज चिंता करण्याची गरज नाही. पुरेसे संख्याबळ आल्यावर नेत्याची निवड करण्यात येईल, असेही ते म्हणाले.
धर्माच्या आधारावर आरक्षण ही संकल्पना मान्य नाही
धर्माच्या आधारावर आरक्षण ही कल्पनाच आम्हाला मान्य नाही, तसे कोणी केले , अगदी मोदींनीसुद्धा तसं केलं तर आम्ही त्याविरोधात संघर्ष करू, असं शरद पवार म्हणाले. पंतप्रधानांसारख्या व्यक्तीला केरळ, कर्नाटत यांसारख्या राज्यात जास्त प्रतिसाद मिळाताना दिसत नाहीये. लोक त्यांना स्वीकारत नाहीत असेही पवार म्हणाले.