संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या जयभीम चौक रहिवासी एका अविवाहित तरुणाने आपल्या राहत्या घरात अज्ञात कारणावरून गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना आज 7 फेब्रुवारी ला दुपारी 12 दरम्यान घडली असून मृतक तरुणाचे नाव कुणाल मेश्राम वय 32 वर्षे रा जयभीम चौक कामठी असे आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदर मृतक हा खाजगी कामे करीत असून आज काही कारणास्तव कामावर गेला नव्हता. तर घरात लहान भाऊ हर्ष मेश्राम दुपारची झोप घेत असल्याचे व आई घरकामात व्यस्त असल्याची संधी साधून मृतक तरुणाने घरातील सिलिंग पंख्याला आईच्या लुगड्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. सदर घटना आईच्या निदर्शनास येताच आईने दुःखाचा एकच हंबरडा फोडत मुलाला वाचविण्याची विनवणी करीत आरडाओरड सुरू केली. दरम्यान घरमंडळीनी एकच धाव घेत त्याला कामठीच्या सिटी हॉस्पिटल येथे हलविण्यात आले. मात्र उपस्थित डॉक्टरने तपासताच आधीच मरण पावल्याचे घोषित केले.
पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून घटनास्थळाचा पंचनामा करीत मृतदेह ताब्यात घेऊन मृतदेहाच्या पार्थिवावर शासकीय उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले.आत्महत्येचे कारण अजूनही कळू शकले नसून पोलिसांनी तूर्तास आकस्मिक घटनेची नोंद केली आहे.मृतकाच्या पाठीमागे आई,वडील व तीन भाऊ असा बराच मोठा आप्तपरिवार आहे.