गडचिरोली : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM KISAN) योजने अंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबास रु. 2000/- प्रती हप्ता या प्रमाणे रू. 6000/- प्रती वर्षी लाभ देण्यात येतो. योजनेचा 13 वा हप्ता वितरणाची कार्यवाही सध्या सुरू आहे. केंद्र शासनाने 13 व्या हप्त्याचा लाभ मिळण्यासाठी लाभार्थींनी e-KYC करणे व लाभ जमा करावयाचे बँक खाते आधार क्रमांकास जोडणे बंधनकारक केले आहे. e-KYC प्रलंबित असलेल्या लाभार्थीस स्वतः पीएम किसान पोर्टलवरील Farmer Corner मधून किंवा सामाईक सुविधा केंद्रातून e-KYC करण्याची सुविधा उपलब्ध आहे.आपल्या सोईनुसार लाभार्थींनी e-KYC प्रमाणिकरण त्वरीत करावे.
पीएम किसान पोर्टलवरील Farmer Corner मधून e-KYC करतांना लाभार्थीस त्यांच्या आधार क्रमांकाशी संलग्न केलेल्या मोबाईलवर येणाऱ्या OTP आधारे e-KYC करता येईल. यासाठी फी आकारणी केली जात नाही. सामाईक सुविधा केंद्रातून e-KYC करण्यासाठी रू. 15/- प्रती लाभार्थी फी आकारणी करण्यात येते.
तसेच लाभार्थींनी पी. एम. किसान योजनेचा लाभ जमा करावयाचे बँक खाते स्वत:च्या आधार क्रमांकास जोडून घ्यावे. यासाठी आधार कार्ड, बँक पासबुक, मोबाईल क्रमांक या कागदपत्रांचे आधारे बँकेत जाऊन आपले बँक खाते आधार क्रमांकाशी जोडून डीबीटी सुविधा प्राप्त करून घ्यावी. e-KYC व बँक खाते आधार क्रमांकाशी जोडणे या बाबी पुर्ण झाल्या तरच या पुढील हप्ते लाभार्थींस मिळणार आहेत. असे उपआयुक्त (कृषि गणना) तथा पथक प्रमुख पी.एम.किसान कृषि आयुक्तालय पुणे, गणेश घोरपडे यांनी कळविले आहे.