स्वच्छता दूत व्हा, स्वच्छतेची जागृती करा: आयुक्त राधाकृष्णन बी. यांचे आवाहन
– जिंगल, लघुपट, चित्रकला, पथनाट्य स्पर्धेचे बक्षीस वितरण
नागपूर :- स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त स्वच्छ भारत अभियानांतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या वतीने नोव्हेंबर- डिसेंबर २०२२ मध्ये विविध स्पर्धा घेण्यात आल्या, मनपाच्या या विविध स्पर्धांमध्ये शालेय विद्यार्थ्यांनी बाजी मारली असून, बहुतांश स्पर्धेत विद्यार्थ्यांनी पुरस्कार पटकाविले आहेत.
पुरस्कर प्राप्त विद्यार्थ्यांनी स्वच्छता दूत म्हणून कार्य करावे आणि स्वच्छतेचा संदेश घरोघरी पोहोचवावा असे आवाहन मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांनी केले. कार्यक्रमाचे नियोजन “शून्य कचरा” संकल्पनेला आधारित होते.
स्वच्छ, सुंदर आणि स्वस्थ नागपूर ही संकल्पना घराघरापर्यंत पोहोचावी आणि नागरिकांनी संकल्पपूर्तीस एकसोबत मिळून कार्य करावे या उद्देशाने नागपूर महानगरपालिकेच्या वतीने स्वच्छ भारत अभियानांर्तगत विविध स्पर्धा घेण्यात आल्या. यात जिंगल स्पर्धा, लघुपट स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, पथनाट्य स्पर्धा यांचा समावेश होता. या स्पर्धांचा पुरस्कार वितरण सोहळा राजे रघुजी भोसले नगरभवन ( टाऊन हॉल), महाल येथे आयोजित करण्यात आला.
याप्रसंगी मनपाचे आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. नागपूर स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजय गुल्हाने, मनपाचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त गजेंद्र महल्ले, शिक्षणाधिकारी राजेंद्र पुसेकर, चित्रकला स्पर्धेचे परीक्षक सेवानिवृत्त प्राध्यापक नंदकिशोर मानकर, प्रा. प्रभाकर पाटील, चित्रकार प्रकाश बेतावार, युसीएन वृत्तवाहिनीचे संपादक राजेश सिंग, नागपूर@२०२५ चे मल्हार देशपांडे यांच्यासह मनपाचे सहाय्यक आयुक्त, अधिकारी व कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमात जिंगल स्पर्धेचे प्रथम पारितोषिक रेशमी यादव, लघुपट स्पर्धेचे प्रथम पारितोषिक रिमा गौरकार, पथनाट्य स्पर्धेचे प्रथम पारितोषिक गीत राजपूत, चित्रकला स्पर्धेचे प्रथम पारितोषिक रुचिका कावळे यांना प्रदान करण्यात आले.
यावेळी मनपा आयुक्त आणि प्रशासक राधाकृष्णन बी. यांनी स्पर्धेच्या विजेत्यांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, मनपाद्वारे राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. नागपूर शहरातील नागरिकांना मूलभूत सोयीसुविधा देण्यासाठी महानगरपालिका कटिबद्ध आहे. स्पर्धेत सहभागी सर्वांनी नागपूर शहराला स्वच्छ आणि सुंदर बनविण्यासाठी पुढे येणे गरजेचे आहे. विशेषतः विजेत्यांनी स्वतःला स्पर्धा पुरते मर्यादित न ठेवता स्वच्छता दूत म्हणून कार्य करावे व्हायला हवे. विजेत्यांनी स्वच्छता विषयी नागरिकांमध्ये जनजागृती करावी आणि शहराच्या विकासासाठी इतर नागरिकांना प्रोत्साहित करायला हवे, असे आवाहन मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांनी केले. कार्यक्रमात मनपाचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी मार्गदर्शन करीत विजेत्यांचे अभिनंदन केले.
विजेत्यांची नाव:
१) जिंगल स्पर्धा
प्रथम – रेशमी यादव, वाल्मिकी नगर हिंदी प्राथमीक शाळा
द्वितीय – करण बंजारी, व्यक्तिगत
तृतीय – अंजुषा पांडवकर, टाटा पारसी हायस्कुल
२) लघुपट स्पर्धा
प्रथम – रिमा विजय गौरकर, वैयक्तिक
द्वितीय – सेंट जोसेफ हायस्कुल
तृतीय- पंकज निलकंठ जगताप / जिंगल एंटरटेन्मेंट, वैयक्तिक
३) पथनाट्य स्पर्धा
प्रथम – गीत राजपुत, जे. एन. टाटा पारसी गर्ल्स हायस्कुल
द्वितीय – नरेश नखाते, निर्मल विद्यालय
तृतीय- लाल बहादुर शास्त्री, म.न.पा. शाळा
४) चित्रकला स्पर्धा
प्रथम – रूचिका कावळे, बालाजी ज्युनियर कॉलेज, शिक्षक कॉलोनी
द्वितीय – कोमल आर. भिसे, मनपा जयताळा माध्यमिक शाळा
तृतीय- शरण आर. गुप्ता, न्यू अॅपोस्टोलोक इंग्लीश हायस्कूल