सैन्य दलाच्या जवानांप्रमाणे पोलीसांबद्दल जनमानसात आदराची भावना -राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

मुंबई :- राज्याचे पोलीस दल संपूर्ण देशात सर्वश्रेष्ठ मानले जाते. सैन्य दलांच्या जवानांप्रती लोकांमध्ये जशी आदराची भावना आहे, तशीच भावना राज्याच्या पोलीसांप्रती देखील आहे. करोना प्रकोपाच्या काळात डॉक्टर्स, नर्सेस यांच्या प्रमाणेच राज्यातील पोलीसांनी देखील जीवाची पर्वा न करता कार्य केले त्यामुळे राज्य पोलीस अभिनंदनास पात्र आहेत, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या प्रमुख उपस्थितीत गोरेगाव मुंबई येथील राज्य राखीव पोलीस दलाच्या मैदानावर महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिन साजरा करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.

गेल्या दहा-वीस वर्षांमध्ये पोलीस दलातील आव्हाने वाढली आहेत. सागरी सुरक्षा, नक्षलवाद यांसारखे धोके आहेतच. त्याशिवाय सायबर सुरक्षा, युवकांमध्ये वाढती नशाखोरी आदी नव्या आव्हानांमुळे पोलिसांना दुप्पट सतर्क राहणे गरजेचे आहे. राज्य शासन पोलीस दलाचे आधुनिकीकरण करीत आहे तसेच मोठ्या प्रमाणावर पोलीस भरती देखील होत आहे. पोलीसांनी कृत्रिम बुद्धिमत्तेसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून राज्य तसेच देश अधिक सुरक्षित करावा असे आवाहन राज्यपालांनी यावेळी केले. आपल्या कृतीतून राज्य पोलिसांनी गीतेतील ‘परित्राणाय साधुनां, विनाशाय च दुष्कृताम’ हे ब्रीद सार्थक केले असल्याचे त्यांनी सांगितले. 

दिनांक २ जानेवारी १९६१ रोजी भारताचे तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी महाराष्ट्र पोलीस दलाला पोलीस ध्वज प्रदान केला होता. त्यामुळे २ जानेवारी हा दिवस पोलीस वर्धापन दिन म्हणून साजरा केल्या जातो, असे पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांनी आपल्या प्रास्ताविकात सांगितले.

दिनांक १ जानेवारी १८२७ रोजी तत्कालीन गव्हर्नर माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन यांनी बॉम्बे प्रेसिडेन्सी असताना बॉम्बे डिस्ट्रिक्ट पोलीस दलाची स्थापना केली होती. ‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ हे ब्रीद वाक्य असलेल्या राज्य पोलीस दलाच्या अंतर्गत १२ पोलीस आयुक्तालय व ३७ जिल्हा पोलीस दल असल्याचे त्यांनी सांगितले. पोलिसांतर्फे सायबर गुन्हे रोखण्यासाठी तसेच महिला, लहान मुले व वरिष्ठ नागरिकांसंबंधातील गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी विविध योजना राबविल्या जात असल्याचे त्यांनी सांगितले. 

सुरुवातीला राज्यपालांनी वर्धापन दिन संचलनाचे निरीक्षण केले व शिस्तबद्ध संचलनाकडून मानवंदना स्वीकारली. संचलनामध्ये मुंबई पोलीस, राज्य राखीव पोलीस दलाची तुकडी, निशाण टोळी, महिला पोलीस व बँड पथक सहभागी झाले होते. यावर्षी बँड पथकाकडून स्वतंत्र वादन, कमांडोज तर्फे मौखिक आदेशाविना सशस्त्र कवायत तसेच श्वानपथकातर्फे गुन्हे अन्वेषण व प्रशिक्षणाची प्रात्यक्षिके सादर करण्यात आली.

कार्यक्रमाला बृहनमुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर तसेच मुंबई पोलीस दलातील ज्येष्ठ अधिकारी, सेवानिवृत्त अधिकारी, पोलीस जवान व निमंत्रित उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

नववर्षात अखेर सहा कंत्राटी कामगार परतले

Mon Jan 2 , 2023
कोराडी औष्णिक वीज केंद्र भुषण चंद्रशेखर यांच्या पाठपुराव्याला यश नागपूर :-३x६६० कोराडी वीज केंद्रातील कोळसा हाताळणी विभागात मागील चार वर्षांपासून कार्यरत सहा कंत्राटी कामगारांना १० जून २०२२ पासून मे. क्रिस्टल इंटरप्राइजेस या कंत्राटदाराने चालू कामावरून कमी केले होते. याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे भुषण चंद्रशेखर यांनी कोराडी वीज प्रशासनाकडे नियमितपणे पाठपुरावा केला. कोळसा हाताळणी विभाग व कोराडी प्रशासनाच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांनी लक्षकेंद्रित करून […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com