औरंगाबाद : डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे महाराष्ट्रासाठी मोठे योगदान असून विविध समाजोपयोगी उपक्रमांसोबतच वृक्ष लागवड, आरोग्य व स्वच्छता अभियानात प्रतिष्ठानने अतुलनीय कामगिरी केली आहे. समाजसेवेचा वारसा प्रतिष्ठानच्या माध्यमातून पुढे जात असून राज्यासाठी ही गौरवास्पद बाब आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केले.
डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्यावतीने औरंगाबाद शहर व परिसरात आयोजित स्वच्छता अभियान कार्यक्रमाप्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. कार्यक्रमास केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, पालकमंत्री संदिपान भुमरे, कृषीमंत्री अब्दुल सत्तार, आमदार संजय शिरसाट, आमदार प्रदीप जैस्वाल, सचिन धर्माधिकारी, राहुल धर्माधिकारी उपस्थित होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या कार्यातून सकारात्मक कृतीची प्रेरणा मिळते. देशाने माझ्यासाठी काय केले यापेक्षा मी देशासाठी काय केले हा विचार रुजविण्याचे मोठे कार्य धर्माधिकारी कुटुंबियांनी केले आहे. आज राज्यात स्वच्छतेची चळवळ उभी राहिली असून गावे आणि शहरांसाठी यातून प्रेरणा मिळते. त्यातील नागरिकांचा मोठा सहभाग इतर हजारो नागरिकांसाठी प्रेरणा देणारा ठरत असून डॉ.नानासाहेब धर्माधिकारी यांचे विचार समाजासाठी दिपस्तंभासारखे आहेत, असेही त्यांनी सांगितले.
राज्याच्या सर्वांगिण विकासासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्नशील असून आज लोकांच्या चेहऱ्यावर आनंद दिसतो आहे. हे सरकार आपले आहे ही भावना महत्वाची आहे. सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी चांगले काम करुया. प्रतिष्ठानच्या वतीने राबविण्यात आलेल्या स्वच्छता मोहिमेत 74 हजार स्वयंसेवकांनी सहभागी होत 748 टन कचरा संकलन केला. या उपक्रमातून शहर स्वच्छ करण्यास मदत झाली असल्याचे सांगून मुख्यमंत्र्यांनी सर्व सहभागी नागरिकांचे अभिनंदन केले.
केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त शहर तसेच परिसरात स्वच्छता मोहिम राबविल्याबद्दल सर्वांचे अभिनंदन केले. राज्यातील अनेक शहरात याच धर्तीवर स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे, ही कौतुकास्पद बाब आहे. निरामयी आरोग्यासाठी स्वच्छता महत्वाची आहे. स्वच्छता मोहिमेसोबतच संस्थेकडून आरोग्य, पर्यावरण संवर्धनासारखे उपक्रम राबविण्यात येतात हे महत्वपूर्ण आहे. प्रतिष्ठानच्या स्वच्छता मोहिमेचा आदर्श घेत आपले शहर स्वच्छ, सुंदर बनविण्यासाठी सर्व मिळून काम करुया, असे आवाहनही डॉ. कराड यांनी केले.
सचिन धर्माधिकारी यांनी प्रतिष्ठानच्या माध्यमातून सुरु असलेल्या उपक्रमांविषयी यावेळी माहिती दिली. उपस्थित स्वयंसेवकांना स्वच्छता आणि वृक्ष लागवड व संवर्धनाबाबत आवाहन केले. या स्वच्छता अभियानासाठी राज्यभरातून आलेले स्वयंसेवक उपस्थित होते.