मुंबई :- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाने शेतीसाठी उपयुक्त ठरलेली जलयुक्त शिवार ही महत्त्वाची योजना पुन्हा सुरू करण्याचा घेतलेला निर्णय शेतकऱ्यांसाठी उपयुक्त असून आपण या निर्णयाचे स्वागत करतो, अशी प्रतिक्रिया भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केली.
ते म्हणाले की, तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ग्रामीण भाग आणि शेतीच्या विकासासाठी जलयुक्त शिवार ही अत्यंत कल्पक आणि प्रभावी योजना सुरू केली. जनतेच्या सहभागातून ही योजना यशस्वी ठरली. त्यामुळे जमिनीतील पाण्याची पातळी राखण्यास मदत झाली आणि सिंचनाच्या क्षमतेत वाढ झाली. तथापि, २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टी महायुतीने विजय मिळविला असताना विश्वासघाताने सत्तेवर आलेल्या महाविकास आघाडी सरकारने जलयुक्त शिवार या अत्यंत उपयुक्त योजनेला स्थगिती दिली. ही योजना बदनाम करण्याचाही प्रयत्न केला. तथापि, आता पुन्हा ही योजना सुरू होत असल्याने ग्रामीण भाग आणि शेतीला लाभ होणार आहे. आपण या निर्णयाबद्दल शिंदे फडणवीस सरकारचे अभिनंदन करतो.
त्यांनी सांगितले की, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात ७५,००० पदांच्या भरती प्रक्रियेला चालना देण्याचा निर्णय राज्यातील युवक युवतींसाठी आश्वासक आहे. पुणे जिल्ह्यातील शिवसृष्टी प्रकल्पाला पन्नास कोटी रुपये अनुदान देणे आणि वाचनसंस्कृतीला चालना देण्यासाठी शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांच्या अनुदानात साठ टक्के वाढ करणे हे निर्णय स्वागतार्ह आहेत.