नागपूर :- Multi-modal International Cargo Hub and Airport at Nagpur (MIHAN) मिहान-सेझ प्रकल्पात उद्योग सुरू करण्याऱ्या उद्योजकांना अनुदानाच्या दरात वीज पुरवठा केला जाईल, अशी हमी राज्य सरकारने दिली होती. मात्र सबसिडी टप्प्याटप्याने काढून घेतली जात असल्याने मोठा असंतोष निर्माण झाला असून, येथील उद्योग शेजारच्या राज्यांमध्ये जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मिहानमधील उद्योजकांना दिलासा देणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मिहान-सेझ प्रकल्पात सध्या ७० ते ७५ लहान – मोठे उद्योग सुरू आहेत. मिहानमध्ये ऊर्जा प्रकल्पासाठी २००६ मध्ये टेंडर काढण्यात आले. त्यानुसार मिहानला विकसित करणारी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने (एमएडीसी) अभिजित एमएडीसी नागपूर एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड (एएमएनइपीएल) ऊर्जा प्रकल्प करारानुसार उभारला होता. त्यानुसार प्रति युनिट २.९८ रुपये वीज उद्योगांना मिळणार होती. पण करार संपुष्टात आल्यानंतर महावितरणकडून थेट ९ रुपये प्रति युनिट वीज मिळणार होती. पण उद्योजकांनी वीज घेण्यास नकार दिल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी केली. त्यानंतर उद्योजकांना ४.३८ रुपये प्रति युनिट दराने वीज मिळू लागली.
आता पुन्हा एमएडीसीने प्रति युनिट १.२५ रुपये अतिरिक्त वीजदराचा उद्योजकांवर भार लादला. तसेच ३०० हॉर्स पॉवरवर अतिरिक्त शुल्क आकारण्यात येणार आहे. कमी दरात वीज पुरवठा करण्याच्या दिलेल्या राज्य शासनाच्या वचनाला एमएडीसीकडूनच तिलांजली दिली जात आहे. यामुळे मिहानमधील उद्योगांवर नकारात्मक परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
या प्रकल्पात ७० ते ७५ उद्योग सुरू आहेत. त्यात अंदाजे पन्नास हजार पेक्षा अधिक लोकांना थेट रोजगार मिळाला आहे. अनेक उद्योजकांनी वीज दरवाढीबाबत उघड नाराजी व्यक्त केली आहे. त्यात मोठ्या कंपन्यांचा समावेश आहे. विजेचे दर अधिक राहिल्यास जे उद्योग सुरु आहेत, तेही दुसरा विचार करू शकतात.
वीजदर कमी करा
मिहानमधील उद्योगांच्या विकासासाठी विजेचे दर कमी असावे, अशी मागणी आहे. उद्योगासाठी जागेचा करार केला त्यावेळी प्रति युनिट २.९८ दराने वीज मिळणार होती. पण भ्रमनिरास झाला. पुढाकाराने ४.३९ रुपये दराने मिळणाऱ्या विजेचे दर पुन्हा ५.६४ रुपयांवर गेले. ३०० रुपये प्रति हॉर्स पॉवरनुसार दर आकारण्यात येणार आहे. त्यामुळे हा दर सहा रुपयांपेक्षा अधिक होणार आहे. अशा अनिश्चिततेमुळे उद्योजकांमध्ये संभ्रम आहे. मिहानमधील विजेचे दर कमी करावेत यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहे. वीज दर कमी करण्याची मागणी आम्ही त्यांच्याकडे करणार आहोत, असे मिहान इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष मनोहर भोजवानी यांनी सांगितले.