मुंबई :- महाराष्ट्रात पावसाने शेतकऱ्यांचे खरीप व रब्बी ही दोन्ही पिके वाया गेली असून सरकारने ओला दुष्काळ जाहीर करतानाच आपला शेतकरीराजा कसा उभा राहिल यासाठी तातडीची मदत जाहीर करावी अशी मागणी राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज पत्रकार परिषदेत केली.
राज्यात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. पुणे तर जलमय करुन टाकले आहे. तर दुसरीकडे पुन्हा एका चक्रीवादळाचे संकट उभे ठाकले आहे. त्यामुळे जनतेला अलर्ट केले पाहिजे. शिवाय धरणाचे पाणी सोडत असताना नदीकाठच्या लोकांनाही सतर्क केले पाहिजे आणि या घटनांकडे सरकारने गांभीर्याने लक्ष द्यावे अशी मागणीही अजित पवार यांनी केली.
राज्यात पावसाने हाहाकार माजवला आहे त्यामुळे शेतकऱ्यांना तात्काळ मदत करावी यासाठी उद्या मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांची वेळ मागितली आहे. त्यांच्याकडे हे विषय मांडणार आहे असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.
मागील महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले होते त्या शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करतो असे सरकारने सांगितले होते मात्र अद्याप पैसे जमा केलेले नाही असे शेतकरी सांगत आहेत अशी दयनीय अवस्था राज्यातील शेतकऱ्यांची झाली आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी तातडीने लक्ष द्यावे असेही अजित पवार म्हणाले.
पावसामुळे रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे आणि शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. काही लोकांच्या घरात पाणी भरले आहे त्यांना तात्काळ धान्याची मदत द्यावी. राज्यसरकारमार्फत जिल्हाधिकाऱ्यांना तसे आदेश देण्यात आले तरच लोकांना दिलासा मिळेल असेही अजित पवार म्हणाले.
पुण्याला नद्यांचे स्वरूप आले आहे. वाहतूकीबाबत कुणाचे लक्ष नाही. वाहतूककोंडीबाबत पोलिसांना विश्वासात घेण्याची गरज आहे. पुण्याला पावसाचा सर्वाधिक फटका बसला आहे. याकडे लक्ष द्यायला हवे ते लक्ष दिले जात नाही असा आरोपही अजित पवार यांनी केला.
राज्यातील जनतेची शंभर रुपयात दिवाळी गोड करणार असे सरकारमार्फत जाहीर करण्यात आले होते त्यासाठी एका कंपनीला काही कोटीचे कंत्राट दिले आहे मात्र अद्याप जनतेपर्यंत शिधा पोचलेला नाही. पारदर्शकपणे व माफक दरात लोकांना हा शिधा मिळावा अशी अपेक्षा आहे मात्र यात काहीतरी गौडबंगाल आहे असेही बोलले जात असल्याचे अजित पवार म्हणाले.
राज्यात बेरोजगारी, महागाई वाढली आहे. नुसती भरती होणार आहे अशा घोषणा सरकार करत आहेत. तरुण याकडे डोळे लावून आहेत. शाळा बंद करण्याचा घाट घातला जात आहे याबाबत सरकारने आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणीही अजित पवार यांनी केली.
या सरकारला शंभर दिवस झाले तरी यासरकारमधील लोकप्रतिनिधीना आपण काय बोलतोय आणि कसे बोलतोय याचे तारतम्य राहिलेले नाही शिवाय अधिकार्यांशी उर्मट भाषा बोलली जात आहे. ही महाराष्ट्राची संस्कृती आहे का असा संतप्त सवालही अजित पवार यांनी केला.