अमरदिप बडगे,प्रतिनिधी
३६ धान खरेदी केंद्राला १ लाख दंड
गोंदिया :- यावर्षी रब्बी हंगामादरम्यान घोळ करणा-या ३८ धान खरेदी केंद्रांना जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने प्रत्येकी १ लाख रूपयांचा दंड ठोठावित दंड भरण्याची नोटीस बजाविली होती. दरम्यान ३८ पैकी १६ केंद्रांनी दंडाची रक्कम भरली तर १० केंद्रांनी त्यांचा कमिशनमधुन दंडाची रक्कम कपात करण्याचे पत्र दिले आहे. तर १२ केंद्रांनी कुठलाच प्रतिसाद न दिल्याने या धान खरेदी केंद्राचे धान खरेदीचे अधिकार गोठविण्यात येणार आहे. यापुढे त्यांना धान खरेदी करता येणार नाही.
यंदा रब्बी हंगामातील धान खरेदी दरम्यान जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या धान खरेदी केंद्रावर ७ जुलैला एकाच तासात ७ क्विंटल धान खरेदी करण्यात आली होती. एवढी खरेदी एकाच दिवशी होणे शक्य नसल्याने व शेतक-यांच्या नावावर व्यापा-यांचा धान खरेदी करण्यात आल्याची ओरड जिल्हाभरात झाली. त्यानंतर १०७ धान खरेदी केंद्राची चौकशी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी व शासनाने दिले. त्यात चौकशी समितीला धान खरेदी केंद्रावर खरेदी प्रक्रियेदरम्यान घोळ झाल्याचे आढळले. त्यामुळे अशा केंद्राचा चौकशी अहवाल शासनाकडे पाठविण्यात आला होता. त्यानुसार ३८ धान खरेदी केंद्रांना प्रत्येकी १ लाख रूपये तर ४२ धान खरेदी केंद्रांना प्रत्येकी ४ हजार रूपयांचा दंड ठोठाविण्यात आला होता. दंडाची रक्कम ३० सप्टेंबरपर्यंत डीडीच्या स्वरूपात जिल्हा मार्केटिंग फेडरेशनकडे जमा करण्याची नोटीस बजाविण्यात आली होती. १६ केंद्रांनी डीडी स्वरूपात तर १२ तर १० केंद्रांनी कमिशनमधुन दंडाची रक्कम कपात करण्याचे पत्र दिले. तर १२ केंद्रांनी कुठलाच प्रतिसाद न दिल्याने या केंद्रांना आता येत्या खरीप हंगामापासुन धान खरेदी करता येणार नसल्याचे जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या अधिका-यांनी सांगितले.