परवानगी घेतानाच मंडळांना द्यावी लागेल विसर्जन स्थळांची माहिती : यंदाही विसर्जनासाठी शहरातील सर्व तलाव बंद
नागपूर ३ : ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस येणा-या सार्वजनिक गणेशोत्सवाच्या तयारीच्या अनुषंगाने मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांनी आढावा घेतला. बुधवारी (ता.३) मनपा मुख्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारतीमधील आयुक्त सभागृहात गणेशोत्सवाच्या तयारीसंदर्भात बैठक घेण्यात आली.
बैठकीत मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी., अतिरिक्त आयुक्त दीपक कुमार मीना, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, उपायुक्त रवींद्र भेलावे, मिलींद मेश्राम, विजय हुमने, सहायक आयुक्त (सा.प्र.वि.) प्रकाश वराडे, अधीक्षक अभियंता मनोज तालेवार, सहायक संचालक नगररचना प्रमोद गावंडे, उपायुक्त घनकचरा व्यवस्थापन डॉ. गजेंद्र महल्ले, मुख्य अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके, कार्यकारी अभियंता अजय मानकर, सहायक आयुक्त गणेश राठोड, हरीश राऊत, घनश्याम पंधरे, सहायक आयुक्त किरण बगडे, क्रीडा अधिकारी पीयूष आंबुलकर आदी उपस्थित होते.
महाराष्ट्र राज्य शासनाद्वारे यंदा गणेशोत्सवावरील सर्व निर्बंध हटविण्यात आले आहेत. राज्य शासनाच्या निर्णयाची नागपूर शहरातही अंमलबजावणी करण्यात येणार आहे. मात्र निर्बंध नसले तरी नागरिकांनी घरगुती श्रीगणेशाच्या मूर्ती ह्या २ फुटापेक्षा जास्त उंचीच्या नसाव्यात याची काळजी घ्यावी, असे आवाहन मनपा आयुक्तांनी केले आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाद्वारे मोठ्या उंचीच्या मूर्तींची स्थापना केली जाते. मात्र त्यांनीही पर्यावरणपूरक गणेशोत्सवाच्या दृष्टीने कमी उंचीच्याच गणेशमूर्तींची स्थापना करण्यासाठी पुढाकार घ्यावा व ४ फूट किंवा त्यापेक्षा कमी उंचीच्या मूर्ती मनपाद्वारे व्यवस्था करण्यात आलेल्या विसर्जनस्थळीच विसर्जीत कराव्यात, असेही आवाहन त्यांनी केले आहे.
नागपूर महानगरपालिकेद्वारे यंदाही शहरातील सर्व तलाव मूर्ती विसर्जनासाठी बंद करण्यात आलेले आहेत. त्यादृष्टीने सर्व तलावांचे योग्य बॅरिकेटींग करण्याचे निर्देश आयुक्तांनी झोनच्या सहायक आयुक्तांना दिले. प्रत्येक झोनमध्ये गणेशोत्सवाच्या परवानगीसाठी विशेष कक्ष सुरू करण्यात यावे. तिथे मनपाचे अग्निशमन विभाग, पोलिस विभाग येथील कर्मचा-यांची नियुक्ती करण्यात यावी. सर्व बाबींची पूर्तता करूनच परवानगी देण्यात यावी. परवानगी देताना मंडळाद्वारे स्थापित करण्यात येणा-या मूर्तीची उंची किती आहे याची नोंद घ्यावी. ती उंची ४ फुटापेक्षा जास्त असल्यास शहरातील कुठल्याही ठिकाणी ४ फुटापेक्षा जास्त उंचीच्या मूर्तीचे विसर्जन प्रतिबंधित असल्याची माहिती देउन ते विसर्जन करणार असलेल्या विसर्जन स्थळाची माहिती त्यांच्याकडून नोंदवून घेण्याबाबत आयुक्तांनी निर्देशित केले.
यावेळी आयुक्तांनी झोननिहाय उपलब्ध कृत्रिम टँक आणि निर्माल्य कलशाचाही आढावा घेतला. सेंट्रींग, धातू, प्लास्टिक आणि खड्डा करून मनपाद्वारे विसर्जनासाठी कृत्रिम तलावाची व्यवस्था करण्यात येते. या कृत्रिम तलावांमध्ये चार फुटापर्यंतच्याच मूर्तींचे विसर्जन करणे बंधनकारक करण्यात आले आहे. सर्व झोनमध्ये कृत्रिम टँकची संख्या आणखी वाढविण्याबाबतही आयुक्तांनी निर्देश दिले.