नागपूर, ता. २६ : जागतिक हिवताप दिनाच्या अनुषंगाने नागपूर महानगरपालिकेच्या हिवताप व हत्तीरोग विभागातर्फे मंगळवारी (ता.२६) हिवताप जनजागृती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. मनपाच्या राजे रघुजी भोसले नगर भवन येथे मनपा प्रशासक व आयुक्त श्री. राधाकृष्णन बी. यांच्या मार्गदर्शनात हिवताप व हत्तीरोग अधिकारी डॉ. जस्मीन मुलानी यांच्या नेतृत्वात ही कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी आयोजित कार्यक्रमात आमदार मोहन मते, सहायक संचालक डॉ. निमगडे, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. गायकवाड, मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार आदी उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते विभागातील उत्कृष्ठ कर्मचा-यांना प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.
कार्यशाळेत उपस्थित मान्यवरांनी हिवताप जनजागृती संदर्भात मार्गदर्शन केले. जागतिक हिवताप दिनाच्या अनुषंगाने हिवतापाचा प्रसार थांबवून निर्मूलन करण्याबाबत जनजागृती रॅली, हिवताप प्रतिबंधात्मक उपायायोजनांचे प्रदर्शन, शाळा, महाविद्यालयातील विविध कार्यक्रमांमध्ये माहितीची ध्वीनीफीत आदीबाबत माहिती देउन त्याचे यावेळी सादरीकरण करण्यात आले.
कार्यक्रमाचे संचालन मंगळवारी झोनचे हिवताप निरीक्षक सत्यवान मेश्राम यांनी केले तर आभार धंतोली झोनचे हिवताप निरीक्षक दिलीप रामटेके यांनी मानले.