पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निमंत्रणावरून मध्य आशियातील युवकांच्या भारत भेटीचे आयोजन
“मुंबईत आल्यावर ‘स्थानिक’ असल्यासारखे वाटत असल्याची किर्गिझस्थान, कझाकस्थान, उझबेकिस्तान, ताजिकिस्तान येथील युवकांची भावना
मुंबई :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्य आशियातील देशांच्या राष्ट्रप्रमुखांसोबत झालेल्या शिखर परिषदेच्या वेळी दिलेल्या निमंत्रणानुसार मध्य आशियाई देशातील चार देशांमधील युवकांचे शिष्टमंडळ मुंबई भेटीवर आले असून शिष्टमंडळातील ८५ युवकांनी रविवारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन येथे सदिच्छा भेट घेतली.
केंद्रीय युवक कल्याण व क्रीडा मंत्रालय व नेहरू युवा केंद्र संघटनेच्या माध्यमातून आयोजित युवकांच्या या भारत भेटीमध्ये किर्गिझस्तान, कझाकस्तान, उझबेकिस्तान व ताजिकिस्तान देशांमधील कला, पत्रकारिता, शिक्षण, औषधी निर्माण तसेच प्रशासन क्षेत्रातील युवकांचा समावेश आहे.
भारत आपल्या स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष साजरे करीत आहे. तसेच मध्य आशियायी देशांशी राजनैतिक संबंध प्रस्थापित होण्यास तीस वर्ष पूर्ण होत असताना शिष्टमंडळाची भारत भेट होत असल्याबद्दल राज्यपालांनी आनंद व्यक्त केला. भारताला ‘हिंदुस्तान’ म्हणतात तसेच मध्य आशियाई देशांच्या नावात देखील ‘स्तान’ शब्द आहे. या शिवाय उभय देशांत अनेक बाबींमध्ये साधर्म्य आहे, असे नमूद करून भाषा, वेशभूषा भिन्न असल्या तरीही आपली मानवता संस्कृती एक आहे,असे राज्यपालांनी सांगितले.
सर्व देशांमध्ये परस्पर सहकार्याच्या माध्यमातून शांतता नांदावी. शांतता असल्यास प्रगती व विकास साधता येईल, असे राज्यपालांनी सांगितले. सर्व देशांमध्ये परस्पर विश्वास निर्माण करणे महत्वाचे आहे, कारण विश्वास नसल्यास विसंवाद होईल असे सांगताना राज्यपालांनी युवक आदान-प्रदान उपक्रमाचे कौतुक केले.
“पहिल्या दिवशी आपण मुंबईत आलो त्यावेळी पाहुणे असल्यासारखे वाटले, परंतु दुसऱ्याच दिवशी आपण स्थानिक ‘मुंबईकर’ असल्यासारखे वाटत आहे”, अशी भावना शिष्टमंडळातील सदस्यांनी व्यक्त केली.
उझबेकिस्तान मध्ये अनेक भारतीय विद्यार्थी उच्च शिक्षण घेत आहेत. भारत जगातील सर्वात मोठी लोकशाही आहे तसेच जलद गतीने वाढत असलेली अर्थव्यवस्था आहे. मुंबई ही आमच्याकरिता देखील एक स्वप्ननगरी आहे असे उझबेकिस्तानच्या प्रतिनिधीने सांगितले.
यावेळी ताजिकिस्तान शिष्टमंडळाचे प्रमुख इंगंबरडीएव्ह अस्लीद्दीन, किर्गिझस्तान शिष्टमंडळाचे प्रमुख तलाईबेक बर्डीएव्ह, कझाकस्तान शिष्टमंडळाच्या प्रमुख उलबॉलसीन ओरॅकबाएव्हा आणि उझबेकिस्तान युवा शिष्टमंडळाचे प्रमुख इस्लोम ओखुनोव्ह तसेच केंद्रीय युवा मंत्रालयाचे अधिकारी मोहम्मद नौशाद आलम उपस्थित होते.
राज्यपालांनी चारही देशांच्या युवा शिष्टमंडळ प्रमुखांचा स्मृतिचिन्ह व खणाचे तोरण भेट देऊन सत्कार केला.