संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- केंद्रीय निवडणूक आयोगाने 16 मार्च ला लोकसभा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला असुन रामटेक लोकसभा निवडणूक ही 19 एप्रिल ला होऊ घातली आहे त्यानुसार प्रशासन सज्ज असून रामटेक लोकसभा मतदार संघात सहा विधानसभा मतदार संघाचा समावेश होत असून यात समाविष्ट कामठी विधानसभा मतदार संघात कामठी,मौदा, नागपूर ग्रामीण या तीन तालुक्याचा समावेश आहे. त्यानुसार कामठी विधानसभा मतदार संघातून एकूण 4 लक्ष 64 हजार 968 मतदान मतदानाचा हक्क बजावणार आहेत.ज्यामध्ये 2 लक्ष 34 हजार 871 पुरुष मतदार तर 2 लक्ष 30 हजार 62 स्त्री मतदार तसेच 15 तृतीयपंथी मतदारांचा समावेश आहे.तेव्हा लोकसभा निवडणुकीच्या महापर्वात सर्वांनी सहभाग नोंदवून जास्तीत जास्त संख्येतील मतदारांनी मतदान करावे असे आवाहन एसडीओ सचिन गोसावी यांनी तहसील कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेतुन व्यक्त केले आहे.याप्रसंगी तहसीलदार गणेश जगदाडे प्रामुख्याने उपस्थित होते.
कामठी विधानसभा मतदार संघात एकूण 508 मतदान केंद्रावर लोकसभेची निवडणूक प्रक्रिया पार पडणार असून यामध्ये 9 अतिरिक्त मतदान केंद्राचा समावेश आहे तसेच 2300 कर्मचारी काम पाहत आहेत तर सात क्रिटिकल मतदान केंद्र असल्याचे सांगण्यात आले.
पुढे बोलताना गोसावी यांनी सांगितले की लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 19 एप्रिल ला होणार असून निवडणूक प्रक्रियेत कामठी विधानसभा मतदार संघात विविध पथकाचे नोडल अधिकारी, क्षेत्रीय अधिकारी,व सहाययक,मास्टर ट्रेनर असे एकूण 2300 कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत.
निवडणूक आयोगाकडून नागरिकासाठी देण्यात आलेल्या सी व्हिजल एप वरून निवडणूक काळातील गैरप्रकाराबाबत तक्रारी करण्यात येणार आहे.एकूण मतदान केंद्रापैकी एक महिला मतदान केंद्र,1 दिव्यांग मतदान केंद्र,1 युवा मतदान केंद्र,1 आदर्श मतदान केंद्र,आहेत.
85 वर्षे अधिक वय व 40 टक्के पेक्षा जास्त दिव्यांग बांधवांना आता घरून मतदान करता येणार आहे तर या लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदाच 85 वर्षे पेक्षा अधिक वय असलेल्या मतदारांना आणि 40 टक्के पेक्षा जास्त दिव्यांग असणाऱ्या मतदारांना घरी मतपत्रिका देण्याचा पर्याय दिलेला आहे.