मुंबई :- विधानसभा निवडणुकीत बुधवारी राज्यात सरासरी ६५ टक्क्यांपेक्षा अधिक मतदान झालं आहे. सहा महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत मतांचा टक्का वाढल्याचं चित्र आहे. अखेरच्या काही तासांत मतदानाने जोर पकडल्याचे चित्र राज्याच्या काही भागांत पाहायला मिळालं. गावखेड्यांमधील मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. मात्र, मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर या शहरी भागांमध्ये काहीसा निरुत्साह कायम असल्याचे दिसले. नाशिक जिल्ह्यासह राज्यातील काही केंद्रांवर रात्री नऊ वाजेपर्यंत मतदान चालू होतं. त्यामुळे मतदानाची जिल्हानिहाय अंतिम आकडेवारी येण्यास विलंब झाला. रात्री ११.४५ वाजता हाती आलेल्या आकडेवारीनुसार राज्यात ६५.११ टक्के मतदान झालं आहे.
मुंबई, ठाणे, पुणे आणि नागपूर या चार मोठ्या शहरांमध्ये मतदानाचं प्रमाण वाढवण्यासाठी निवडणूक आयोगाने विशेष प्रयत्न केले होते. मात्र त्याला फारसे यश आले नसल्याचे पाहायला मिळाले. राज्यात सर्वाधिक ८२ टक्के मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील कागल मतदारसंघात झाल आहे. तेथे वैद्याकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ आणि राष्ट्रवादीचे (शरद पवार) समरजितसिंह घाटगे यांच्यातच चुरशीची लढत होत आहे. सर्वात कमी ४१ टक्के मतदान हे कल्याण पश्चिम मतदारसंघात झालं आहे. मंत्रालय व विधानभवन ही सत्तेची प्रमुख केंद्रे असलेल्या कुलाबा मतदारसंघांत टक्केवारी वाढवण्यासाठी बरेच प्रयत्न झाले असले तरी तिथे ४५ टक्केच मतदान झाले आहे.
३० वर्षांमधील सर्वाधिक मतदान
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी राज्यात सायंकाळी ६ वाजेपर्यंत राज्यात सरासरी ६५.११ टक्के मतदान झालं आहे. गेल्या ३० वर्षांमध्ये पहिल्यांदाच राज्यात इतक्या मोठ्या प्रमाणात मतदान झाल्याचं पाहायला मिळालं आहे. १९९५ साली ७१.६९ टक्के मतदानाची नोंद झाली होती. अलीकडच्या काही वर्षांमध्ये राज्यात कधीच ६५ टक्क्यांहून अधिक मतदान झालं नव्हतं. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत ६१.३९ टक्के मतदानाची नोंद झाली होती. तर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत ६१.४ टक्के मतदान झालं होतं. मागील निवडणुकीच्या तुलनेत यंदा ३.७ टक्के मतदान वाढलं आहे. ही मतदानाची वाढलेली आकडेवारी निवडणुकीच्या निकालात महत्त्वाची भूमिका बजावू शकते. दरम्यान, २०१९ मध्ये राज्यात ८.८५ कोटी नोंदणीकृत मतदार होते. त्यात गेल्या पाच वर्षांमध्ये ९.५ टक्के वाढ झाली असून राज्यात आता ९.६९ टक्के मतदार आहेत.