Ø मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेंतर्गत पहिली ट्रीप
Ø धामनगाव रेल्वे स्थानकावर भाविकांना शुभेच्छा
यवतमाळ :- मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेंतर्गत जिल्ह्यातील भाविकांची पहिली ट्रीप धामनगाव रेल्वे स्थानकावरून विशेष ट्रेनने अयोध्येकडे रवाना झाली. अयोध्येसाठी 742 भाविकांनी नोंद केली होती. त्यापैकी 570 भाविक आज रवाना झाले. राज्य शासनाच्यावतीने भारतीय रेल्वेद्वारे भाविकांची प्रवास, निवास व भोजन व्यवस्था करण्यात आली आहे.
धामनगाव रेल्वे स्टेशन येथे प्रस्थान प्रसंगी समाजकल्याणच्या सहाय्यक आयुक्त मंगला मुन, रेल्वे सल्लागार समिती सदस्य कमल छांगाणी, अर्चना राऊत, स्टेशन प्रबंधक मुदलियार यांच्यासह समाजकल्यास विभाग, भारतीय रेल्वेच्या आयआरसीटीसीचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. रेल्वे स्थानकावर भाविकांच्या स्वागताचा सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी काही भाविकांना तीर्थ दर्शन प्रवासाचे तिकीट देऊन स्वागत व शुभेच्छा देण्यात आल्या.
राज्यातील सर्व धर्मीयांमधील 60 वर्ष व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना देशातील तीर्थक्षेत्राची मोफत यात्रा करण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत अयोध्या येथे दर्शनासाठी जिल्ह्यातील 742 भाविकांनी नोंदणी केली होती. त्यांच्यासोबत 58 भाविक याप्रमाणे 800 नागरिकांची टीम दर्शनाला जाण्याचे नियोजन करण्यात आले होते. प्रत्यक्षात 570 ज्येष्ठ भाविक विशेष रेल्वेगाडीने श्रीराम दर्शनासाठी अयोध्याकडे रवाना झाले.
धामनगाव रेल्वे स्टेशनवर भाविकांनी जय श्रीरामच्या घोषणा देत तीर्थ दर्शन प्रवासास सुरुवात केली. रेल्वे स्थानकात भक्तिमय वातावरण झाले होते. भाविकांमध्ये उत्साह दिसून येत होता. नोंदणी केलेल्या भाविकांनी सकाळी 9 वाजता रेल्वे स्थानकावर पोहोचण्याच्या सूचना असल्याने भाविक सकाळपासूनच स्थानकात दाखल झाले. भाविकांची गर्दी व श्रीरामाचा गजर याठिकाणी पाहावयास मिळाला. दि.16 मार्च पर्यंत चार दिवसाची ही यात्रा आहे. यादरम्यान भाविकांची भोजन, निवास, प्रवास व्यवस्था विनामुल्य करण्यात आली आहे.
याप्रसंगी आरपीएफच्या पोलिस निरीक्षक यशोदा यादव, उपनिरीक्षक एच.एल.मिना, गजानन जाधव, राजेश औतकर, दत्तापूर ठाणेदार गिरीश ताथोड, रेल्वेचे वाणिज्य निरिक्षक दीपक साहू, लॉयन्सचे चेतन कोठारी, विलास बुटले उपस्थित होते. ट्रेनचे चालक आनंद यादव हजारीलाल आणि करीम यांचे यावेळी पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.