३७व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा – महाराष्ट्राचे अग्रस्थानावरील वर्चस्व अबाधित

पणजी :-महाराष्ट्राने ३७व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत शुक्रवारी नवव्या दिवशी अग्रस्थानावरील वर्चस्व अबाधित राखले. मिनी गोल्फ, ट्रक सायकलिंग, जलतरण आणि अ‍ॅथलेटिक्स या क्रीडा प्रकारातील क्रीडापटूंनी या यशात प्रमुख छाप पाडली. महाराष्ट्राने आतापर्यंत ६३ सुवर्ण, ५६ रौप्य आणि ५९ कांस्यपदकांसह एकूण १७८ पदके जिंकली आहेत. सेनादल दुसऱ्या आणि हरयाणा तिसऱ्या स्थानावर आहे.

महाराष्ट्र मिनी गोल्फ संघाने दोन सुवर्ण आणि दोन रौप्य अशा एकूण चार पदकाची कमाई केली. ट्रॅक सायकलिंग क्रीडा प्रकारात मयुरी लुटेच्या शानदार कामगिरीच्या बळावर महाराष्ट्राने एक सुवर्ण, एक रौप्य आणि एक कांस्य अशी एकूण तीन पदकांची कमाई केली. मयुरीने वैयक्तिक सुवर्णपदकासह हॅट्ट्रिक साजरी केली. जलतरणात महाराष्ट्राने तीन रौप्यपदके कमावली. ऋषभ दासने पुरुषांच्या ५० मीटर्स बॅकस्ट्रोक शर्यतीत रौप्यपदक जिंकले आणि रूपेरी हॅट्ट्रिक पूर्ण केली. याचप्रमाणे मिश्र रिले शर्यतीत महाराष्ट्राला रौप्यपदक मिळाले.

—-

*जलतरण*

*जलतरणात ऋषभ दासची रूपेरी हॅट्ट्रिक*

-मिश्र रिले शर्यतीत महाराष्ट्राला रौप्य 

-दिवसभरात तीन रौप्य पदके 

पणजी :-

महाराष्ट्राच्या ऋषभ दासने पुरुषांच्या ५० मीटर्स बॅकस्ट्रोक शर्यतीत रौप्यपदक जिंकले आणि राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील स्वतःची रूपेरी हॅट्ट्रिक पूर्ण केली. याचप्रमाणे मिश्र रिले शर्यतीत महाराष्ट्राला रौप्यपदक मिळाले. जलतरणात महाराष्ट्राने शुक्रवारी तीन रौप्यपदके कमावली.

ऋषभने ही शर्यत २६.६६ सेकंदांत पार केली. कर्नाटक संघाचा श्रीहरी नटराजने (२५.७७ सेकंद) सुवर्णपदक जिंकले.

ऋषभने याआधी या स्पर्धेत १०० मीटर्स बॅकस्ट्रोक व २०० मीटर्स बॅकस्ट्रोक शर्यतीत रौप्यपदक जिंकले होते. ऋषभ हा ठाणे येथे ज्येष्ठ प्रशिक्षक गोकुळ कामत यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतो. ऋषभने आजपर्यंत राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये भरघोस पदके जिंकली आहेत.

महाराष्ट्र संघाने चार बाय १०० मीटर्स मिश्र रिले शर्यतीत रौप्यपदक पटकावले. मित मखिजा, अवंतिका चव्हाण, ऋजुता खाडे व वीरधवल खाडे यांचा समावेश असलेल्या महाराष्ट्र संघाने ही शर्यत ३ मिनिटे, ४२.६१ सेकंदांत पार केली. कर्नाटक संघाने हेच अंतर ३ मिनिटे, ३८.२४ सेकंद अशा विक्रमी वेळेत पूर्ण करीत सुवर्णपदक जिंकले.

डायव्हिंगमध्ये ऋतिका श्रीरामची पदकांची हॅट्ट्रिक

महाराष्ट्राच्या ऋतिका श्रीरामने राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील डायव्हिंगमध्ये एक मीटर स्प्रिंग बोर्ड प्रकारात रौप्यपदक जिंकताना पदकांची हॅट्ट्रिक पूर्ण केली. तिने १५१ गुण नोंदवले. या स्पर्धेमध्ये तिने या अगोदर एक रौप्य व एक कांस्यपदक जिंकले होते.

ऋतिका ही सोलापूरची खेळाडू असून तिचे पती हरिप्रसाद हेदेखील आंतरराष्ट्रीय डायव्हिंगपटू आहेत. रेल्वेमध्ये नोकरी करणाऱ्या ऋतिकाला तीन वर्षांचा मुलगा असूनही ती नियमितपणे राष्ट्रीय स्पर्धांमध्ये भाग घेत आहे. दोन वर्षांपूर्वी तिला राष्ट्रीय स्पर्धेत तीन सुवर्णपदके मिळाली होती तर गतवर्षी गुजरातमध्ये झालेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील दोन सुवर्ण व एका कांस्यपदकाची कमाई केली होती.

वॉटरपोलोमध्ये महाराष्ट्र पुरूष संघ २६ वर्षांनी अंतिम फेरीत

महाराष्ट्र संघाने पश्चिम बंगाल संघावर १६-४ असा दणदणीत विजय नोंदवला आणि वॉटरपोलोमधील पुरुष गटात अंतिम फेरी गाठली. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत तब्बल २६ वर्षांनी महाराष्ट्र संघ अंतिम फेरीसाठी पात्र ठरला आहे. महाराष्ट्राच्या महिला संघाला मात्र उपांत्य फेरीत पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे त्यांना आता कांस्यपदकासाठी खेळावे लागणार आहे.

पुरुषांच्या उपांत्य फेरीत अरुण मिश्रा यांच्या मार्गदर्शनाखाली उतरलेल्या महाराष्ट्राने सुरुवातीपासूनच पश्चिम बंगाल विरुद्ध वर्चस्व गाजवले. महाराष्ट्रकडून सारंग वैद्य व उदय उत्तेकर यांनी प्रत्येकी चार गोल केले तर गौरव महाजनी व पियुष सूर्यवंशी यांनी प्रत्येकी दोन गोलांची नोंद केली. अंतिम फेरीत महाराष्ट्रास सेनादल संघाबरोबर खेळावे लागणार आहे. महिलांच्या उपांत्य फेरीत महाराष्ट्राला केरळ संघाने १६-७ असे सहज पराभूत केले. शनिवारी सकाळी होणाऱ्या तिसऱ्या क्रमांकाच्या लढतीत महाराष्ट्राची कर्नाटक संघाची गाठ पडणार आहे. त्यानंतर पुरुष गटाचा अंतिम सामना होणार आहे.

—-

*सायकलिंग*

*वैयक्तिक सुवर्णपदकासह मयुरी लुटेची हॅट्ट्रिक*

*महाराष्ट्राची एकूण तीन पदकांची कमाई*

नवी दिल्ली :-

मयुरी लुटेच्या शानदार कामगिरीच्या बळावर महाराष्ट्राने राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमधील ट्रॅक सायकलिंग क्रीडा प्रकारात शुक्रवारी एक सुवर्ण, एक रौप्य आणि एक कांस्य अशी एकूण तीन पदकांची कमाई केली. मयुरीने वैयक्तिक सुवर्णपदकासह हॅट्ट्रिक साजरी केली.

नवी दिल्लीच्या इंदिरा गांधी क्रीडा संकुलातील वेरणा-बिर्ला बायपास एअरपोर्ट रोडवर चालू असलेल्या या स्पर्धेमधील १००० मीटर स्प्रिंट शर्यतीमध्ये महाराष्ट्राच्या मयुरीने सुवर्णपदक आणि श्वेता गुंजाळने कांस्यपदक मिळवण्याची किमया साधली. दिल्लीच्या त्रियशा पॉल हिला रौप्यपदक मिळाले.

३००० मीटर सांघिक परसूट प्रकारात महाराष्ट्राच्या महिला संघाने रौप्यपदक पटकावले. महाराष्ट्राच्या संघात मयुरीसह सुशिकला आगाशे, वैष्णवी गभने, शिया लालवाणी आणि पूजा दानोळे यांचा समावेश होता. या शर्यतीत मणिपूरच्या संघाला सुवर्णपदक आणि हरयाणाच्या संघाला कांस्य पदक मिळाले.

महाराष्ट्राने ट्रॅक सायकलिंगमध्ये आतापर्यंत चार पदके मिळवली असून, मयुरीने गुरुवारी ५०० मीटर टाइम ट्रायलमध्ये कांस्यपदक पटकावले होते.

—–

वुशू

सलोनीला रौप्य आणि विशालला कांस्य पदक

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील वुशू क्रीडा प्रकारात सलोनी जाधवने रौप्य आणि विशाल शिंदेने कांस्य पदक पटकावले. या क्रीडा प्रकारात महाराष्ट्राने शुक्रवारी दोन पदके जिंकली.

सलोनीने तावलूमधील नंदावा प्रकारात १० पैकी ८ गुण मिळवले. या अंतिम सामन्यात नऊ संघांचा समावेश होता. याचप्रमाणे विशालने ८८ किलो वजनी गटात बिहार आणि हिमाचल प्रदेशच्या खेळाडूंवर विजय मिळवला. पण जम्मू काश्मीरच्या क्रीडपटूकडून पराभव पत्करला.

—-

*मिनी गोल्फ*

*महाराष्ट्राचा पदकांचा चौकार*

महाराष्ट्र मिनी गोल्फ संघाने राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत शुक्रवारी दोन सुवर्ण आणि दोन रौप्य अशा एकूण चार पदकाची कमाई केली.

सांघिक प्रकारातील महाराष्ट्राच्या संघात सुधीर, पार्थ, चेतन आणि संदीप यांचा समावेश होता. महाराष्ट्राच्या पवन डोईफोडेने अश्विनी भिवगडेच्या साथीने मिश्र गटात सुवर्णपदकाचा बहुमान पटकावला. मध्य प्रदेश संघाने रौप्य आणि गुजरातने कांस्यपदक जिंकले. एकेरीत रोहित नांदुरकरने महाराष्ट्रासाठी रौप्यपदक पटकावले. त्यापाठाेपाठ महाराष्ट्र संघ दुहेरीत रौप्यपदक विजेता ठरला. सुमीत आणि निखिलने हे यश संपादन केले.

—-

*स्क्वॉश*

*महाराष्ट्र संघाला दुहेरी सुवर्णयशाची संधी*

महाराष्ट्राच्या पुरुष आणि महिला स्क्वॉश संघांना राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत दुहेरी सुवर्णयशाची संधी असेल. दोन्ही संघांची शनिवारी अंतिम फेरीत तमिळनाडूशी सामने होतील.

महाराष्ट्राच्या महिला संघाने उपांत्य फेरीत उत्तर प्रदेशवर २-० असा एकतर्फी विजय मिळवला. या संघात उर्वशी जोशी, निरुपमा दुबे आणि अंजली यांचा समावेश आहे. महाराष्ट्राच्या पुरुष संघाने सेनादलाचा २-० असा पराभव केला.

—-

*टेनिस*

*टेनिसपटूंकडून चार पदकांची निश्चिती*

महाराष्ट्राच्या टेनिसपटूंनी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमधील चार पदकांची निश्चिती केली आहे. आंतरराष्ट्रीय टेनिसपटू ऋतुजा भोसले आणि प्रार्थना ठोंबरेने महिला दुहेरीची, ऋतुजा आणि अर्जुन कढेने मिश्र दुहेरीची तसेच अर्जुन आणि पूरव राजाने पुरुष दुहेरीची अंतिम फेरी गाठली आहे. याचप्रमाणे वैष्णवी अडकरने महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत स्थान मिळवले आहे.

पुरुष दुहेरीत उपांत्य सामन्यात अर्जुन-पूरव जोडीने हरयाणाच्या दिग्विजय सिंग आणि करण सिंग यांचा रोमहर्षक लढतीत ७-५, ७-६ (७-१) असा पाडाव केला.

महिला दुहेरीत महाराष्ट्राच्या ऋतुजा-प्रार्थना जोडीने तमिळनाडूच्या साईसमिथा आणि जनानी रमेश जोडीला ६-०. ६-० असे सरळ सेटमध्ये नामोहरम केले.

मिश्र दुहेरीत ऋतुजा आणि अर्जुन जोडीने पश्चिम बंगालच्या युबरानी बॅनर्जी आणि नितीन सिन्हावर ६-१, ६-३ असा विजय मिळवला.

महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व सामन्यात महाराष्ट्राच्या वैष्णवीने हरयाणाच्या अंजली राठीला ६-१, ०-६, ६-४ असे हरवले. वैष्णवीची उपांत्य सामन्यात गुजरातच्या वैदेही चौधरीशी गाठ पडणार आहे.

—–

*कुस्ती*

*विक्रम कुऱ्हाडेला कांस्यपदक*

महाराष्ट्राचा मल्ल विक्रम कुऱ्हाडेने राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील कुस्तीच्या ६० किलो वजनी गटात कांस्यपदकाची कमाई केली.

विक्रमने कांस्यपदकाच्या लढतीत बिहारच्या हिरा यादवला १०-० असे तांत्रिक गुणाच्या आधारे पराभूत केले. पहिल्या फेरीत त्याने तेलंगणाच्या अभिषेक कुमारला पराभूत केले. मात्र नंतर त्याला चंडीगडच्या सुमित कुमार याच्याविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला होता. सुमीत कुमार अंतिम फेरीत पोहोचल्यामुळे विक्रमला कांस्यपदकाच्या लढतीत सहभागी होण्याची संधी मिळाली आणि त्याने त्याचा फायदा घेत पदकावर आपले नाव कोरले.

—–

*अ‍ॅथलेटिक्स*

*स्टीपलचेस शर्यतीत कोमल जगदाळेला रौप्यपदक, तर मिश्र रिलेमध्ये कांस्यपदक *

महाराष्ट्राच्या कोमल जगदाळेने राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमधील अ‍ॅथलेटिक्स क्रीडा प्रकारच्या अखेरच्या दिवशी तीन हजार मीटर्स स्टीपलचेस शर्यतीत शुक्रवारी रौप्यपदक पटकावले. याचप्रमाणे चार बाय ४०० मीटर्स मिश्र रिले स्पर्धेत महाराष्ट्राला कांस्यपदक मिळाले.

बाम्बोलिम येथील जिएमसी अ‍ॅथलेटिक्स स्टेडियमवर झालेल्या या शर्यतीत कोमलने हे अंतर १० मिनिटे, २१.६६ सेकंदांत पार केले. हरयाणाच्या प्रीती लांबाला सुवर्णपदक मिळाले. तिला हे अंतर पार करण्यासाठी १० मिनिटे, १९.७८ सेकंद वेळ लागला.

चार बाय ४०० मीटर्स मिश्र रिले स्पर्धेत रोहन कांबळे, यमुना लडकत, राहुल कदम व अनुष्का कुंभार यांच्या समावेश असलेल्या महाराष्ट्र संघाने ही शर्यत तीन मिनिटे २३.२० सेकंदात पार केली.

—–

*हॉकी*

*वेंकटेश केंचेच्या दुहेरी गोलमुळे महाराष्ट्राचा पश्चिम बंगालवर दणदणीत विजय*

वेंकटेश केंचेच्या दुहेरी गोलमुळे महाराष्ट्राने राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील हॉकीमध्ये पश्चिम बंगालवर ४-१ असा दणदणीत विजय मिळवला.

मापुसा येथील पेड्डेम क्रीडा संकुलात चालू असलेल्या हॉकीच्या साखळी सामन्यात वेंकटेशने दुसऱ्याच मिनिटाला गोल करून महाराष्ट्राचे खाते उघडले. मग ११व्या मिनिटाला वेंकटेशने आणखी एक मैदानी गोल करीत पहिल्या सत्रात महाराष्ट्राला २-० अशी आघाडी मिळवून दिली. मग दुसऱ्या सत्रात १६व्या मिनिटाला अजिंक्य जाधवने मैदानी गोल नोंदवत ही आघाडी ३-० अशी वाढवली. नंतर २१व्या मिनिटाला राजेंद्र ओरमने बंगालचा पहिला गोल केला. पण तरीही मध्यंतराला महाराष्ट्राकडे ३-१ अशी वर्चस्वपूर्ण आघाडी होती. तिसऱ्या सत्राच्या अखेरच्या मिनिटाला (४५वे मिनिट) तालिब शाहने महाराष्ट्राच्या खात्यावर चौथ्या गोलची भर घातली. त्यानंतर चौथ्या सत्रात दोन्ही संघांना गोल करण्यात अपयश आले.

महाराष्ट्राने तीन सामन्यांत तीन विजय मिळवून एकूण ९ गुणांसह बाद फेरीतील स्थान जवळपास निश्चित केले आहे. रविवारी महाराष्ट्राचा साखळीतील शेवटचा सामना हरयाणाशी होईल.

—–

*तायक्वांदो*

*दोन कांस्यपदके*

महाराष्ट्राच्या तायक्वांदोपटूंनी शुक्रवारी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत दोन कांस्यपदके जिंकली.

महिलांच्या ५३ किलोखालील गटात निशिता कोतवालने तिसरा क्रमांक मिळवला. दिल्लीच्या अनिशा अस्वालने सुवर्ण आणि रक्षा चहरने रौप्यपदक पटकावले.

महिलांच्या ७३ किलोवरील गटात नम्रता तायडेने तिसरा क्रमांक मिळवला. गोव्याच्या रुडाली बारूआने सुवर्णपदक आणि व्हि प्रवलिका कुस्तागीनेने रौप्यपदक पटकावले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

सायकलिंग - वैयक्तिक सुवर्णपदकासह मयुरी लुटेची हॅट्ट्रिक

Sat Nov 4 , 2023
– महाराष्ट्राची एकूण तीन पदकांची कमाई नवी दिल्ली :- मयुरी लुटेच्या शानदार कामगिरीच्या बळावर महाराष्ट्राने राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमधील ट्रॅक सायकलिंग क्रीडा प्रकारात शुक्रवारी एक सुवर्ण, एक रौप्य आणि एक कांस्य अशी एकूण तीन पदकांची कमाई केली. मयुरीने वैयक्तिक सुवर्णपदकासह हॅट्ट्रिक साजरी केली. नवी दिल्लीच्या इंदिरा गांधी क्रीडा संकुलातील वेरणा-बिर्ला बायपास एअरपोर्ट रोडवर चालू असलेल्या या स्पर्धेमधील १००० मीटर स्प्रिंट शर्यतीमध्ये […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!