राज्य शासनाच्या विकास कार्यक्रमासाठी 2500 कोटींच्या रोख्यांचा 30 जानेवारीला लिलाव

मुंबई :- राज्य शासनाच्या विकास कार्यक्रमासंबधित खर्चासाठी 11 वर्षे मुदतीच्या 2500 कोटींच्या रोख्यांची विक्री करण्यात येणार असून, या कर्जाद्वारे मिळालेल्या रकमेचा वापर शासनाच्या विविध विकास कामास अर्थपुरवठा करण्यासाठी केला जाणार आहे, अशी माहिती वित्त विभागाने दिली आहे.

राज्य शासनाच्या सर्वसाधारण अधिसूचनेमधील अस्पर्धात्मक लिलाव पद्धतीनुसार (सुधारित) एकूण अधिसूचित केलेल्या शासन कर्जरोखे रकमेच्या 10 टक्के रक्कम पात्र वैयक्तिक व संस्थात्मक गुंतवणुकदारांना वाटप करण्यात येईल. मात्र, एका गुंतवणुकदारास एकूण अधिसूचित रकमेच्या जास्तीत जास्त एक टक्का रकमेच्या मर्यादेपर्यंतच वाटप करण्यात येईल.

भारतीय रिझर्व्ह बँकेतर्फे 30 जानेवारी 2024 रोजी त्यांच्या फोर्ट, मुंबई येथील कार्यालयात हा लिलाव आयोजित करण्यात येईल. लिलावाचे बिडस् 30 जानेवारी 2024 रोजी संगणकीय प्रणालीनुसार, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, कोअर बँकिंग सोल्यूशन, (ई-कुबेर) सिस्टिमनुसार सादर करावयाचे आहेत.

यामध्ये स्पर्धात्मक बिडस् सकाळी 10.30 ते 11.30 वाजेपर्यंत तर, अस्पर्धात्मक बिडस् संगणकीय प्रणालीद्वारा, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, कोअर बँकिंग सोल्यूशन (ई-कुबेर) सिस्टिमनुसार सकाळी 10.30 ते 11.00 वाजेपर्यंत सादर करावेत.

लिलावाचा निकाल भारतीय रिझर्व्ह बँक, मुंबईतर्फे त्यांच्या संकेतस्थळावर त्याच दिवशी प्रसिद्ध करण्यात येईल. यशस्वी झालेल्या बिडर्सकडून रकमेचे प्रदान 30 जानेवारी 2024 रोजी करण्यात येईल.

यशस्वी झालेल्या बिडर्सकडून 30 जानेवारी 2024 रोजी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, फोर्ट, मुंबई यांच्या कार्यालयात रोखीने, बँकर्स धनादेश/प्रदान आदेश, डिमांड ड्राफ्ट किंवा त्यांच्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, मुंबई येथील खात्यात देय असलेले धनादेश बँकेची कामकाजाची वेळ संपण्यापूर्वी अधिदानाने प्रदान करण्यात येतील. कर्जरोख्याचा कालावधी 11 वर्षांचा असेल.

रोख्यांचा कालावधी 30 जानेवारी 2024 पासून सुरु होईल. कर्जरोख्याची परतफेड 30 जानेवारी 2035 रोजी पूर्ण किंमतीने केली जाईल. व्याजाचा दर हा लिलावात विक्री केलेल्या रोख्यावरील दरसाल दर शेकडा कूपन दराएवढा असेल. व्याजाचे प्रदान प्रतिवर्षी जुलै 31 व 31 जानेवारी रोजी सहामाही पद्धतीने करण्यात येईल.

शासकीय रोख्यांमधील बँकांची गुंतवणूक ही बँकिंग विनियम अधिनियम 1949 खालील कलम 24 अंतर्गत सांविधिक रोकड सुलभता गुणोत्तर (SLR) या प्रयोजनार्थ पात्र समजण्यात येईल. हे कर्जरोखे पुन: विक्री-खरेदीसाठी अनुज्ञेय असतील.

NewsToday24x7

Next Post

अनुदानापासून एकही दूध उत्पादक शेतकरी वंचित राहू नये - मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

Thu Jan 25 , 2024
मुंबई :- शासनाच्या वतीने देण्यात येणाऱ्या दूध अनुदानापासून एकही दूध उत्पादक शेतकरी वंचित राहणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे निर्देश महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज संबधित अधिकाऱ्यांना दिले. राज्यातील सहकारी संघ व खासगी दूध प्रकल्पांना दूध पुरवठा करणाऱ्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना दुधासाठी शासनाने प्रतिलिटर ५ रुपये अनुदान जाहीर केले आहे. या दूध अनुदानाबाबत […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com