खासदार क्रीडा महोत्सवाच्या तारखांची घोषणा : क्रीडा संघटकांना ध्वज वितरित
56 खेळ, 62 मैदाने, 56 हजार खेळाडू, 1 कोटी 30 लाखांवर रोख पुरस्कार
नागपूर : मागील चार वर्षांपासून नागपूर शहरात होत असलेला खासदार क्रीडा महोत्सव व्यापक स्वरूप घेत असल्याचा आनंद आहे. देशासाठी दखलपात्र ठरलेल्या खासदार क्रीडा महोत्सवाच्या पाचव्या पर्वात 56 हजार खेळाडू सहभागी होत आहेत. या महोत्सवात सहभागी होणाऱ्या सर्व खेळाडूंच्या सुरक्षेच्या दृष्टीने त्यांचा वैयक्तिक विमा काढण्यात येणार आहे, अशी घोषणा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली.
शनिवारी (24 डिसेंबर) केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेत आणि अभिनेता आणि बॉडी बिल्डर अनुप सिंह ठाकूर, कुस्तीपटू संगीता फोगाट आणि पद्मभूषण, पद्मश्री पॅरा ऑलिम्पिक गोल्ड मेडलिस्ट देवेंद्र झंझरीया यांच्या विशेष उपस्थितीत रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहात पाचव्या खासदार क्रीडा महोत्सवाच्या तारखांची घोषणा आणि क्रीडा संघटकांना ध्वज वितरण करण्यात आले.
मंचावर आमदार सर्वश्री प्रवीण दटके, नागो गाणार, कृष्णा खोपडे, टेकचंद सावरकर, माजी खासदार डॉ.विकास महात्मे, खासदार क्रीडा महोत्सव समितीचे मुख्य संयोजक माजी महापौर संदीप जोशी, माजी आमदार सर्वश्री अनिल सोले, डॉ. मिलिंद माने, सुधीर दिवे, पीयूष आंबुलकर उपस्थित होते.
यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह अनुप सिंह ठाकूर, संगीता फोगाट आणि देवेंद्र झंझरीया यांनी रिमोटची कळ दाबून पाचव्या खासदार क्रीडा महोत्सवाच्या 8 जानेवारी ते 22 जानेवारी 2023 या तारखांची घोषणा केली. आमदार नागो गाणार, माजी आमदार सर्वश्री प्रा. अनिल सोले, डॉ. मिलिंद माने, माजी खासदार डॉ. विकास महात्मेयांच्या हस्ते क्रीडा संघटकांना ध्वज प्रदान करण्यात आले.
पुढे बोलताना ना.नितीन गडकरी म्हणाले, आज नागपूर शहर आणि विदर्भातील प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनात खेळाडू घडत आहेत. या खेळाडूंसाठी खासदार क्रीडा महोत्सव महत्वाचे व्यासपीठ ठरत आहे. या व्यासपीठाच्या माध्यमातून आणि प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनात हेच खेळाडू ऑलिम्पिक मध्ये देशाला पदक मिळवून देतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. खेळाडूंना उत्तम सुविधा मिळणे आवश्यक आहे. यंदाच्या खासदार क्रीडा महोत्सवात 62 मैदानांवर 56 हजार खेळाडू 56 विविध खेळ खेळणार आहेत. या महोत्सवात 5 हजार ऑफिसिअल असतील विजेत्यांना 1 कोटी 30 लाख 87 हजार 743 रुपयांचे रोख पुरस्कार देण्यात येतील. याशिवाय यावर्षी सर्व 56 हजार खेळाडूंचा 2 लाख रुपयांचा विमा काढण्यात येत आहे. वर्षभर हा विमा कार्यान्वित राहणार खेळाडूंना याचा फायदा होईल, असेही ना. नितीन गडकरी म्हणाले.
यावर्षी दिव्यांग, ज्येष्ठ आणि महिलांसाठी विशेष स्पर्धा घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
हे तर ‘नागपूर ऑलिम्पिक’ : देवेंद्र झंझरीया
शहरातील खेळाडूंसाठी एवढे आयोजन हे केवळ महोत्सव नसून हे जणू ‘नागपूर ऑलिम्पिक’च आहे, अशा शब्दांत पद्मभूषण, पद्मश्री पॅरा ऑलिम्पिक गोल्ड मेडलिस्ट देवेंद्र झंझरीया यांनी खासदार क्रीडा महोत्सवाचा गौरव केला. देशात खेळ आणि खेळाडूंच्या सुविधांमध्ये 2014 पासून सुधारणा झाल्याचा त्यांनी यावेळी उल्लेख केला. 2002 च्या एथेन्स पॅरा ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालो असता नागपूरकर विजय मुनीश्वर प्रशिक्षक असल्याची आठवण त्यांनी सांगितली. या स्पर्धेत कुठल्याही सुविधेविना खेळून सुवर्ण पदक मिळविल्याचेही त्यांनी सांगितले. त्यावेळी बाजूलाच चीनच्या खेळाडूला वैयक्तिक कोच, ट्रेनर, फिजिओ असल्याचे पाहून वाईट वाटले होते पण 2021 च्या ऑलिम्पिकमध्ये हे सर्व आपल्याला मिळाल्याचे त्यांनी आनंदाने सांगितले. त्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्याची प्रशंसा केली. ना. गडकरींची संकल्पना, त्यांची सकारात्मक विचारसरणी पुढे जाण्यास प्रेरणादायी असल्याचेही ते म्हणाले.
पालकांनो मुलांना खेळासाठी प्रोत्साहन द्या
अनुप सिंह ठाकूर आणि संगीता फोगाट यांचे आवाहन
नागपूर शहरात होत असलेल्या खासदार क्रीडा महोत्सवाची प्रत्येक खेळाडूला पुढे जाण्यासाठी गरज आहे. अशा महोत्सवांमधूनच देशाला ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवून देणारे खेळाडू निघणार आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचा राष्ट्रध्वज उंचावण्यासारखा आनंद कुठलाच नाही. त्यामुळे पालकांनो अभ्यासासोबतच मुलांना एक ना एक खेळ खेळण्यासाठी प्रोत्साहन द्या, असे आवाहन अभिनेता आणि बॉडी बिल्डर अनुप सिंह ठाकूर व कुस्तीपटू संगीता फोगाट यांनी केले. अनुप सिंह ठाकूर यांनी एथिलीट म्हणून जागतिक स्तरावर देशासाठी सुवर्ण पदक मिळवून दिल्याचे यावेळी सांगितले.
दिव्यांग आणि विदर्भासाठी विशेष स्पर्धा : संदीप जोशी
प्रास्ताविकात खासदार क्रीडा महोत्सवाचे मुख्य संयोजक माजी महापौर संदीप जोशी यांनी महोत्सवातील नव्या बदलांची माहिती दिली. यंदाच्या खासदार क्रीडा महोत्सवात खेळ आणि खेळाडूंची संख्या वाढली आहे. मात्र केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या सूचनेनुसार यावर्षी दिव्यांगांसाठी तीन दिवसीय विशेष महोत्सव घेण्यात येत आहे. यासोबतच ज्येष्ठांसाठी एक दिवसीय आणि महिलांसाठी ‘वो वुमनिया’ विशेष स्पर्धा होणार आहेत. विशेष म्हणजे पाचव्या खासदार क्रीडा महोत्सवात 6 खेळांच्या विदर्भस्तरीय स्पर्धा होणार आहेत. विदर्भस्तरीय कबड्डी, खो-खो, अथेलेटिक्स, बास्केटबॉल, कुस्ती आणि सायकलिंग स्पर्धा होणार आहेत. खासदार क्रीडा महोत्सवाच्या माध्यमातून विदर्भातील खेळाडूंनाही एक मोठा मंच मिळणार आहे, असा विश्वास संदीप जोशी यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाचे संचालन माय एफएम चे आरजे आमोद यांनी केले. डॉ. विवेक अवसरे यांनी आभार मानले. सियाराम यांच्या दमदार गीतांवर प्रेक्षकांनी चांगलाच ठेका धरला होता.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी खासदार क्रीडा महोत्सव समितीचे नागेश सहारे, डॉ. पद्माकर चारमोडे, डॉ. संभाजी भोसले, डॉ. विवेक अवसरे, सचिन देशमुख, अशफाक शेख, अमित संपत, सतीश वडे, सचिन माथाने, सुनील मानेकर, लक्ष्मीकांत क्रिपाने, आशिष मुकीम, प्रकाश चंद्रायण आदींनी सहकार्य केले.