विधानसभा निवडणुकीसाठी बृहन्मुंबई क्षेत्रात १० हजार १११ मतदान केंद्रे

– प्रत्येक केंद्रावर सरासरी १२०० मतदार

मुंबई :- महाराष्ट्र विधानसभा निवडणूक-२०२४ च्या पार्श्वभूमीवर, भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार, मतदारांना सुलभतेने मतदान करता यावे, या दृष्ट‍िकोनातून बृहन्मुंबई क्षेत्रातील (मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्हे) मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण करण्यात आले आहे. या सुसूत्रीकरण कार्यक्रमामुळे बृहन्मुंबई क्षेत्रातील मतदान केंद्रांची संख्या १० हजार १११ झाली आहे. लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ च्या तुलनेत मतदान केंद्रांच्या संख्येत २१८ ने वाढ झाली आहे. यामध्ये प्रत्येक मतदान केंद्राच्या ठिकाणी पूर्वी असणारी सरासरी १५०० मतदारांची संख्या आता सरासरी १२०० पर्यंत असेल, त्यामुळे मतदान केंद्रांची संख्या वाढली असून परिणामी मतदानाचे प्रमाण आणि वेग वाढण्यास मदत होणार आहे.

निवडणूक आयोग आणि राज्य निवडणूक आयोग यांच्या निर्देशांनुसार, जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्या मार्गदर्शनाखाली आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून नियोजनबद्ध पद्धतीने तयारी सुरू आहे. याच धर्तीवर मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण करण्यात आले आहे.

बृहन्मुंबई क्षेत्रातील मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण करताना प्रामुख्याने एका मतदान केंद्रावर सरासरी १२०० पर्यंत मतदारसंख्या राहील, हे सूत्र लक्षात ठेवून मतदान केंद्रांची संख्या निश्चित करण्यात आली आहे. तर, अधिक मतदान केंद्र असणाऱ्या एकाच ठिकाणावरील मतदान केंद्रांचे विक्रेंद्रीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे, लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ च्या तुलनेत बृहन्मुंबईतील काही भागांमध्ये मतदान केंद्रांची संख्या वाढली आहे.

याच अनुषंगाने बृहन्मुंबईतील विविध मतदारसंघांमधील मतदान केंद्रांमध्ये झालेल्या सुसूत्रीकरणाची माहिती देण्यासाठी राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसोबत बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयात १९ सप्टेंबर २०२४ रोजी बैठक पार पडली. मतदान केंद्र सुसूत्रीकरणाची माहिती देण्यासाठी, मतदारांमध्ये जनजागृती करण्याच्या उद्देशाने जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्या मार्गदर्शनाखाली, अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी तथा अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांनी विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसोबत बैठक घेऊन सविस्तर माहिती दिली. अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी तथा मुंबई शहर जिल्हाधिकारी संजय यादव, विशेष कार्य अधिकारी (निवडणूक) विजय बालमवार, संबंधित अधिकारी आणि विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी बैठकीला उपस्थित होते.

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक – २०२४ वेळी मुंबई शहर जिल्ह्यामध्ये एकूण २ हजार ५०९ मतदान केंद्र होते. तर, मुंबई उपनगर जिल्ह्यात ही संख्या ७ हजार ३८४ होती. सुसूत्रीकरण कार्यक्रमामुळे मतदान केंद्रांची संख्या अनुक्रमे २ हजार ५३७ आणि ७ हजार ५७४ म्हणजेच संपूर्ण बृहन्मुंबई क्षेत्रात (मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्हे) १० हजार १११ इतकी झाली आहे.

सुसूत्रीकरण केल्याने मतदान केंद्रांच्या ठिकाणांमध्ये झालेल्या नवीन बदलांसंदर्भात मतदारांना माहिती देण्यासाठी प्रशासनाच्या वतीने ‘आपले मतदान केंद्र जाणून घ्या’ म्हणजेच ‘Know Your Polling Station’ ही जनजागृती मोहीम हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत मतदार नोंदणी अधिकारी मतदारांच्या घरी जाऊन मतदान केंद्रांच्या ठिकाणामध्ये झालेल्या बदलांची माहिती देतील. याशिवाय, नोंदणीकृत मतदारांना लेखी पत्राद्वारे तसेच प्रसारमाध्यमांच्या माध्यमातूनही माहिती देण्यात येईल, असेही प्रशासनाकडून कळविण्यात येत आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

वन नेशन-वन इलेक्शन निर्णयाचे स्वागतच – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Sat Sep 21 , 2024
मुंबई :- वन नेशन वन इलेक्शन ही संकल्पना क्रांतिकारी आहे. या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. बळकट लोकशाही असलेल्या भारतातील निवडणूक प्रक्रिया या संकल्पनेमुळे आणखी प्रभावी आणि मतदारांसाठी सोयीची ठरेल, असे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने देशात एक देश-एक निवडणूक या संकल्पनेला मंजूरी दिली आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री शिंदे यांनी ही प्रतिक्रीया दिली आहे. मुख्यमंत्री म्हणतात […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!