– जागतिक नाविन्यता दिनानिमित्त नाविन्यता, उद्योजकतेच्या विविध उपक्रमांचे उद्घाटन
नागपूर :- आरोग्य, शिक्षण, ग्रामीण विकास, पायाभूत सुविधा आदी क्षेत्रात नाविन्यपूर्ण संशोधनाद्वारे समस्यांवर तोडगा काढण्यासाठी युवकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा यांनी आज येथे केले.
जागतिक नाविन्यतादिनाच्या औचित्याने जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, मार्गदर्शन केंद्राच्यावतीने आयोजित कार्यक्रमात शर्मा बोलत होत्या. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या डॉ. डोरले सभागृहात आयोजित या कार्यक्रमास कौशल्य विकास विभागाचे सहायक आयुक्त प्रभाकर हरडे, एल.आय.टी. संस्थेचे संचालक डॉ. आर. बी. मानकर,विद्यापीठाच्या आंतरविद्याशाखेचे प्रमुख डॉ. प्रशांत कडू आदी यावेळी उपस्थित होते.
येत्या दोन महिन्यांदरम्यान नागपूर विभागात नाविन्यता व उद्योजकता कार्यक्रमांतर्गत राबवायच्या हॅकेथॉन, कार्यशाळा, विविध स्पर्धा आणि जनजागृतीपर उपक्रमांचे कुलगुरु डॉ. सुभाष चौधरी यांच्या हस्ते उद्घाटन झाले.
शर्मा म्हणाल्या, नागपूर विद्यापीठांतर्गत मोठया प्रमाणात महाविद्यालयांचा समावेश होतो. जिल्ह्यात शाळांची संख्याही मोठी आहे. या शैक्षणिक संस्थांमधील विद्यार्थ्यांमध्ये संशोधकवृत्तीही आहे. या प्रतिभेच्याजोरावर विद्यार्थी व युवकांनी समाजातील विविध समस्यांवर तोडगा काढण्यासाठी आर्टीफिशीयल इंटॅलीजन्सचा वापर करावा. तसेच ॲप व स्टार्टअप्स निर्मितीच्या माध्यमातून उपायात्मक संशोधन केल्यास विकासात मोठा हातभार लागेल. कौशल्य विकास विभागाच्यावतीने येत्या दोन महिन्यांदरम्यान नागपूर विभागात राबविण्यात येणाऱ्या नाविन्यता व उद्योजकतेच्या विविध उपक्रमांमध्ये सहभागी होऊन या युवकांनी संधीचे सोने करावे, असेही शर्मा यांनी सांगितले.
कुलगुरु डॉ. चौधरी म्हणाले, जिल्हा कौशल्य विकास विभागाच्यावतीने नागपूर विभागातील नागरी भागासह ग्रामीण भागात कौशल्य विकासाचे विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. या उपक्रमांसाठी विद्यापीठाशी संलग्न 500 महाविद्यालयांचे पूर्ण सहकार्य देण्यात येईल. ग्रामीण भागात उत्तमोत्तम संशोधनाचे होत आहेत. शासनाच्या या उपक्रमांद्वारे ग्रामीण भागातील अशा संशोधनास मंच मिळावा आणि या भागात कौशलय विकासाच्या योजनांबाबत जनजागृती व्हावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
जिल्हा कौशल्य विकास विभागाच्यावतीने येत्या दोन महिन्यात 10 पेक्षा अधिक टेक्नीकल बिझनेस इन्क्युबेटर्स (टिबिआय), 100पेक्षा अधिक इन्सिटीट्युशनल कौंसील, 25 पेक्षा अधिक अटल टिंकरींग लॅब्स, नागपूर विद्यापीठाशी संलग्न 500 महाविद्यालय आणि 300 शाळांचे विद्यार्थी यांच्यासाठी नाविन्यता व उद्योजकतेचे विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. हॅकेथॉनद्वारे नागपूर विभागातील नवनवीन संशोधन आणि संकल्पनांना प्रोत्साहन देण्यात येणार आहे. याच स्पर्धेच्या माध्यमातून नवीन स्टार्टअपसह शालेय विद्यार्थी, महिला आणि ग्रामीण अशा चार गटांतून नवसंशोधनाला मंचही उपलब्ध होणार आहे.
नागपूर विद्यापीठाच्या इन्क्युबेशन सेंटरचे संचालक डॉ. अभय देशमुख यांनी येत्या दोन महिन्यात राबविण्यात येणाऱ्या नाविन्यता व उद्योजकतेच्या विविध उपक्रमांबाबत सादरीकरण केले. जिल्हा कौशल्य विकास विभागाचे कार्यक्रम समन्वयक मनिष कुदळे यांनी कार्यक्रमाचे संचलन केले व आभार मानले.