वाडीत राष्ट्रीय युवा दिन साजरा
नागपूर : आजचा तरुण उद्याची दशा आणि दिशा ठरविणार आहे, त्यासाठी आजच्या तरुणाईला गरज आहे आदर्श विचारांची आणि कार्य कुशल नेतृत्वाची. समाजातील दिशाहीन तरुणांना मार्गदर्शन करण्यासाठी स्वामी विवेकानंद यांच्या विचारांचा प्रसार करण्याची जबाबदारी भावी पिढिने स्विकारण्याचे आवाहन उपजिल्हाधिकारी पियुष चिवंडे यांनी केले.
भारत सरकार सूचना व प्रसारण मंत्रालयाच्या केंद्रीय संचार ब्युरो, क्षेत्रीय कार्यालय, नागपूर यांच्यावतीने विमलताई तिडके विद्यालयात स्वामी विवेकानंद यांच्या 161 व्या जयंती निमित्त राष्ट्रीय युवा दिन व राजमाता जिजाऊ यांची 425 वी जयंती दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.
याप्रसंगी मंचावर केंद्रिय संचार ब्युरो नागपूरचे प्रभारी सहा संचालक हंसराज राऊत, मुख्याध्यापक अनिल धोटे उपस्थित होते. यावेळी उपजिल्हाधिकारी पियुष चिवंडे यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून रॅलीचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी शाळेतील विद्यार्थी व शिक्षक मोठ्या संख्येने रॅलीत सहभागी झाले होते.
याप्रसंगी उपजिल्हाधिकारी पियुष चिवंडे, प्रभारी सहायक संचालक हंसराज राऊत यांनी विद्यार्थ्यांशी हितगुज साधून शिक्षण क्षेत्रातील जुन्या आठवणींना उजाळा देत अभ्यास करण्याच्या विविध पद्धतीवर मार्गदर्शन केले. यावेळी दिगंबर गोहणे, संदीप लापकाळे, वंदना पाटील, शीतल अवझे, श्रावण ढवंगाळे, अश्विनी फलके, प्रवीण राऊत, सुरेखा घागरे, किशोर गरमले, कलावती चवरे, कुंजन, नागपूर संचार ब्युरोचे संजय तिवारी, चंदू चेडुके, नरेश गच्छकायला आदी प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्र संचालन सुरेश फलके यांनी केले.