नागपूर :- यशवंत पंचायत राज अभियानात उत्कृष्ट काम केल्याबद्दल काटोल पंचायत समितीची राज्यस्तरावरील दुसऱ्या क्रमांकाच्या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. सन २०२१-२२ या आर्थिक वर्षामध्ये केलेल्या कामाचे मूल्यमापन विचारात घेऊन विभागस्तर व राज्यस्तर अशा दोन स्तरावर “यशवंत पंचायत राज अभियान” ही अभिनव पुरस्कार योजना राबविण्यात आली होती. या पुरस्कार निवडीबाबतचा शासन निर्णय आज 12 जून 2023 रोजी ग्राम विकास विभागामार्फत निर्गमित करण्यात आला आहे. यात राज्यस्तरावरील पुरस्कारासाठी प्रथम तीन पंचायत समितीमध्ये अनुक्रमे लातूर, काटोल (जिल्हा नागपूर) व राहता (जिल्हा अहमदनगर) यांची निवड करण्यात आली आहे.
तसेच विभागस्तरीय पुरस्कार प्राप्त पंचायत समितीमध्ये नागपूर विभागात प्रथम पुरस्कार काटोल (जिल्हा नागपूर) व द्वितीय पुरस्कार कामठी ( जिल्हा नागपूर) यांना प्राप्त झाला आहे तर कुरखेडा (जिल्हा गडचिरोली) व चंद्रपूर (जिल्हा चंद्रपूर) या पंचायत समित्यांना तृतीय पुरस्कार विभागून देण्यात आला आहे.
@ फाईल फोटो