खासदार क्रीडा महोत्सव 2023 : रायफल शूटिंग स्पर्धा
नागपूर :- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या खासदार क्रीडा महोत्सवातील रायफल शूटिंग स्पर्धेमध्ये सर्वोत्तम कामगिरी करीत यश कु-हेकर आणि कनक जयस्वाल ‘चॅम्पियन ऑफ चॅम्पियन’ ठरले.
तालुका क्रीडा संकुल आहुजा नगर येथे झालेल्या स्पर्धेत एअर पिस्टल प्रकारात खुल्या गटात यश कु-हेकरने बाजी मारली. तर एअर रायफल प्रकारात कनक जयस्वाल हिने विजेतेपद पटकाविले. दोन्ही विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रत्येकी ११ हजार रुपये रोख व विजेते चषक प्रदान करून सन्मानित करण्यात आले.
एअर पिस्टल प्रकारात खुल्या गटात मोहम्मद खान ने दुसरा क्रमांक पटकाविला. एअर रायफल मध्ये आदित्य जगताप ने दुसरे स्थान पटकाविले. दोन्ही विजेत्यांना प्रत्येकी ७ हजार रुपये व चषक प्रदान करण्यात आले.
पुरस्कार वितरण समारंभात माजी आमदार डॉ. मिलींद माने, माजी नगरसेवक वीरेंद्र कुकरेजा, महेंद्र धनविजय, संजय भेंडे, अर्जुन पुरस्कार विजेते राज्यातील एकमेव अर्जुन क्रीडा पुरस्कार आणि द्रोणाचार्य पुरस्कार विजेते विजय मुनीश्वर, नवनीतसिंग तुली आदी उपस्थित होते. गुरूवारी (ता. १२) खासदार क्रीडा महोत्सवाचे संयोजक माजी महापौर संदीप जोशी यांनी स्पर्धेला भेट देउन खेळाडूंना प्रोत्साहन दिले.