यवतमाळ :- प्रकल्प संचालक आत्मा व राष्ट्रीय बियाणे निगमच्या संयुक्त विद्यमाने कृषी विज्ञान केंद्र येथे शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थित कंपन्यांच्या संचालकांना तज्ञांद्वारे विविध विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. कार्यशाळेचे उद्घाटन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रमोद लहाळे यांनी केले.
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट नागपूरचे तनवीर मिर्झा यांनी शेतकरी उत्पादक कंपनी कशी चालवावी यासंदर्भामध्ये सविस्तर मार्गदर्शन केले. सनदी लेखापाल दीपक झंवर यांनी शेतकरी उत्पादक कंपनीचे ऑडिट, आर्थिक विश्लेषण, आराखडा व इतर अनुषंगिक बाबींवर मार्गदर्शन केले. सचिन मालकर यांनी शेतकरी उत्पादक कंपनीसाठी व्यवसाय आराखडा सोबतच कंत्राटी शेती जसे संत्रा, भाजीपाला, शेवगा या संदर्भामध्ये माहिती दिली.
आत्माचे प्रकल्प संचालक संतोष डाबरे यांनी शेतकरी उत्पादक कंपनीसाठी कृषी विभागाच्या विविध योजना जसे नैसर्गिक शेती, स्मार्ट, कृषी पायाभूत निधी इत्यादी योजनांबाबत माहिती दिली. योजनेचे महत्व व योजनांचा लाभ कसा घ्यावा, याबाबत मार्गदर्शन केले. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री.लहाळे यांनी पीएमएफएमई व इतर योजनांची माहिती दिली.
शेतकऱ्यांनी आपल्या शेतमालावर प्राथमिक प्रक्रिया करून त्याची निर्यात कशी करावी तसेच यवतमाळ जिल्ह्यामध्ये असलेल्या निर्यातीच्या संधी याबाबत सौरभ यादव यांनी सखोल मार्गदर्शन केले. जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. विजय रहाटे यांनी पशुसंवर्धन विभागाच्या योजनांविषयी मार्गदर्शन केले.
राष्ट्रीय बीज निगमचे विपणन अधिकारी विजय अनुषे यांनी शेतकरी उत्पादक कंपन्यांना बियाण्याची डीलरशिप व इतर बाबींसंदर्भात मार्गदर्शन केले. आयटीसी ई-चौपालचे प्रवीण रणनवरे यांनी सुद्धा सोयाबीन खरेदी संदर्भात मार्गदर्शन केले. कार्यशाळेचे संचालन ब्रह्मानंद चव्हाण, सुरज डाखोरे यांनी केले तर आभार कृषी उपसंचालक तेजस चव्हाण यांनी मानले. कार्यशाळेला जिल्हाभरातून शेतकरी उत्पादक कंपनीचे संचालक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.