मुंबई :- राष्ट्रीय पाळणाघर योजनेचा आढावा घेऊन निर्णय घेण्याबाबत समिती स्थापन करणार असल्याचे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले.
मंत्रालयातील दालनात केंद्र शासनाद्वारे मान्यता प्राप्त राष्ट्रीय पाळणाघर योजनेतंर्गत दुर्बल घटकातील कामकाजी महिला, पाळणाघर महिला कमर्चारी यांच्याबाबत आयोजित बैठकीत महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे बोलत होत्या. यावेळी महिला व बालविकास विभागाचे सचिव डॉ.अनुपकुमार यादव, ऑल एन.जी.ओ.वेल्फेअर असोसिएन ऑफ इंडियाचे अध्यक्ष दादाराव डोंगरे यांच्यासह अन्य सदस्य उपस्थित होते.
महिला व बालविकास मंत्री कु.तटकरे म्हणाल्या की, राष्ट्रीय पाळणाघर योजनेचा आढावा घेण्यासाठी महिला व बालविकास आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात येईल. आतापर्यंत केंद्राकडून आलेले अनुदान व जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांनी केलेल्या तसेच त्या कालावधीतील सर्व तपशील तपासून याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात येईल.
जेथे कामगार जास्त आहेत, अशा ग्रामीण भागात आणि शहरी भागातही जिथे अंगणवाडीला जोडून एखादी खरेदी असेल अशा ठिकाणी पाळणाघर सुरू करण्याचे विचाराधीन आहे. केंद्राच्या मार्गदर्शक सूचनाप्रमाणे आणि राज्य शासनाच्या नियमावलीप्रमाणे पाळणाघर सुरू करण्याबाबतही निर्णय घेऊ अशी ग्वाही मंत्री तटकरे यांनी दिली.