नागपूर :- पाली भाषा ही भारतीय संस्कृतीची मूळ भाषा आहे. मात्र या भाषेवर सतत अन्याय होत आलेला आहे. भारतीय भाषांच्या विकासात पालीचे स्थान सर्वश्रुत असताना देखील जाणीव पूर्वक पाली भाषेबाबत अन्यायात्मक भूमिका सतत घेतली जाते. त्याकरिता एकजुटीने संघर्ष करण्याची गरज आहे. पाली भाषेचे स्वतंत्र विद्यापीठ व्हावे आणि यूपीएससी मध्ये पालीभाषा पुर्ववत सुरू करण्यात यावी या उद्देशाने पाली भाषे करिता पुन्हा लढा उभारणार, असा दृढ संकल्प पाली विभूषण डॉ बालचंद्र खांडेकर यांनी व्यक्त केला.
ते अनागारीक देवमित्र धम्मपाल यांच्या जयंती प्रित्यर्थ आयोजित कार्यक्रमात अध्यक्ष स्थानावरून बोलत होते.
पाली-प्राकृत विभाग, बौद्ध अध्ययन केंद्र आणि पाली प्रचारिनी सभा यांच्या संयुक्त विद्यमाने अनागारिक धम्मपाल जयंती आणि पाली भाषा कथाकथन स्पर्धा, बक्षीस वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी प्रमुख अतिथी डॉ मालती साखरे, विभाग प्रमुख डॉ निरज बोधी, डॉ प्रणोती सहारे मंचावर उपस्थित होते.
पुढे डॉ खांडेकर म्हणाले की पालीभाषा जनमाणसात पोहोच विण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्यासाठी कथाकथन स्पर्धा, धम्मपद पाठांतर स्पर्धा आदी उपक्रम सातत्याने राबविले गेले पाहिजे.
डॉ मालती साखरे या आपल्या मार्गदर्शनात म्हणाल्या की अनागारीक देवमित्र धम्मपाल यांचे कार्य बौद्ध धम्माच्या पुनरुत्थानात अतिशय महत्त्वाचे आहे. महाबोधी महाविहार सारख्या बौद्ध स्थळांना मुक्त करण्याची चळवळ उभारून त्यांनी बौद्ध सांस्कृतिक वारसा वितंड वाद्यांच्या तावडीतून मुक्त केला, हे महान कार्य त्यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ नीरज बोधी यांनी केले. यावेळी पाली कथाकथन स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात आले. स्पर्धेचे प्रथम पारितोषिक गौतमी पवनीकर यांनी पटकावले, द्वितीय पारितोषिक चंदा लाडे यांनी तर तृतीय पारितोषिक उषा नागदिवे यांनी प्राप्त केले. विद्यार्थ्यांच्या वतीने पालीचे विद्यार्थी उत्तम शेवडे ह्यांनी विजेत्या स्पर्धकांचे अभिनंदन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा सरोज चौधरी यांनी तर समारोप डॉ बिना नगरारे यांनी केला. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने आजी-माजी विद्यार्थी, स्पर्धक व पालकही उपस्थित होते.