नागपूर :- जिल्हा परिषदेच्या (Nagpur ZP) ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे विशिष्ट कंत्राटदारावरील (Contractor) प्रेम कमी होताना दिसत नाही. पूर्वी नानक कंस्ट्रक्शन कंपनीवर विभाग मेहरबान होता. आता पुन्हा एकाच कंत्राटदाराला कोट्यवधींची कामे देण्यात आली आहेत. त्यावरून एकाच कंत्राटदाराला कामे देण्याची परंपरा नव्याने सुरू करण्यात आली आहे.
पूर्वीच पाणीपुरवठा विभागात एका विशिष्ट कंत्राटदारांची चलती होती. इतर विभागातही दबदबा होता. संबंधित कंत्राटदार पाणीपुरवठा विभागातील काही अधिकारी, कर्मचाऱ्यांना हाताशी धरून टेंडर बळकाविण्यासाठी फिल्डिंग लावत असल्याची माहिती आहे. टेंडर अधिकाधिक आपल्याच मिळावी म्हणून तांत्रिक बाबी हेरून संपूर्ण प्रक्रिया करण्यात येते. आतापर्यंत जल जीवन मिशन, राष्ट्रीय पेयजल योजना व टंचाई कृती आराखड्यातील तीन ते चार कोटींची कामे लाटल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे संबंधित कंत्राटदाराचे टेंडर अतिशय कमी दराचे असल्याचे सांगण्यात येते. पूर्वी असाच प्रकार होता. चौकशीत सुरक्षा ठेवीचा मोठा घोटाळा समोर आला.
उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रमाणापेक्षा बिलो कामे देऊ नयेत, अशा प्रकारची कामे झाली असल्यास त्या कामांच्या गुणवत्तेची चौकशी करावी. दोषी आढळल्यास कारवाईचे स्पष्ट निर्देश त्यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत अधिकाऱ्यांना दिले होते. तरीही असा प्रकार जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागात होत असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत असून पालकमंत्र्यांना येथील अधिकारी गांभीर्याने घेत नसल्याचे दिसते. याची सखोल चौकशी झाल्यास विभागातील काही अधिकारी, कर्मचारी अडचणीत येणार असल्याचे सांगण्यात येते. कार्यकारी अभियंता उमल चांदेकर यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता झाला नाही.
उपअभियंता विभागातच
सुरक्षा ठेव घोटाळा प्रकरणात विभागातील तत्कालीन प्रभारी कार्यकारी अभियंत्यावरही संशयाची सुई होती. त्यानंतर त्यांच्याकडून प्रभार काढून घेण्यात आला. परंतु त्यानंतर त्यांना विभागातच ठेवण्यात आले. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कार्यप्रणालीवरही प्रश्न निर्माण होत आहे.