– नागपूर स्थानकातील हमालांमध्ये आक्रोश
नागपूर :- कालानुरूप झालेला विकास आणि उपलब्ध सोयी सुविधांमुळे रेल्वे स्थानकांवर असलेल्या हमालांचे (कुली) महत्त्व कमी झाले आहे. सद्या नागपूर स्थानकावर कार्यरत असलेल्या हमालांनाच काम मिळत नसताना पुन्हा अतिरिक्त भरतीचा घाट का घातला जातोय असा संतप्त सवाल हमालांनी विचारला आहे. यासंदर्भात रेल्वे स्टेशन कुली ऑटो चालक taxi चालक कल्याणकारी सेवा संस्थेच्या वतीने या संदर्भात संस्थेचे अध्यक्ष अजय पाटील यांच्या नेतृत्त्वात नुकतीच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेण्यात आली.कुली आणि त्यांच्या समस्या संदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली.गेल्या काही वर्षात प्रवाशांना मिळणाऱ्या सोयी सुविधा आणि स्थानकावरील सोयी सुविधात प्रचंड वाढ झाली आहे.
नागपूर स्थानकावर बहुतांश प्रत्येक प्लॅटफॉर्म वर स्वयंचलित जिने झाले आहेत. प्रत्येक ओव्हर ब्रीज वर रॅम्प आहे. बॅटरी कार ने सुद्धा सामानाची ने आण करण्यात येते. प्लॅटफॉर्म क्रमांक ८ वर कार टू कोच अशी व्यवस्था आहे. ज्या माध्यमातून प्रत्येक प्रवासी कार मधून सरळ कोच मध्ये पोचतो. प्रत्येक प्रवाशाजवळ असलेल्या बॅगला चाके असतात. या सर्व सोयी सुविधांमुळे कुलींचे काम अत्यंत कमी झाले आहे. दररोज १५० पैकी ५० कुली कमाविना असतात. गेल्या काही वर्षात यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे कठीण झाले आहे. अशातच नागपूर रेल मंडळ कार्यालय मध्य रेलच्या वतीने ४० कुली भरती करण्याची जाहिरात काढण्यात आली आहे, ज्यात नागपूर स्टेशनवर ५ नव्या कुलींची ची भरती प्रस्तावित आहे.
नागपूर स्थानकावर अतिरिक्त कुली असताना हा भरतीचा घाट कशाला, असा प्रश्न संस्थेने विचारला आहे. बल्लारपूर, चंद्रपूर सारख्या स्थानकावर कुलींची गरज असेल तर तेथे द्यावेत, नागपूरला नकोत. ही भरती तात्काळ रद्द करण्यात यावी, अशी मागणी संस्थेचे अध्यक्ष अजय पाटील, महासचिव अब्दुल मजीद,अजिज मोहम्मद, अजय पाल, कुनाल गौरखेडे, राहुल टोंभुरणे, ज्ञानेशवर पाटील , विशाखा डबले, रूनाली राऊत , सोनु गायकवाड या सर्व पदाधिकाऱ्यांनी केली आहे.