गोदावरी खोऱ्याला दुष्काळमुक्त करण्यासाठी पश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी वळविणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

– शिर्डी जवळील काकडी येथे ‘शासन आपल्या दारी’ जिल्हास्तरीय कार्यक्रम संपन्न

अहमदनगर :- गोदावरी खोऱ्याला कायमचे दुष्काळमुक्त करण्यासाठी राज्यातील पश्चिम वाहिनी नद्यांचे समुद्राला वाहून जाणारे पाणी गोदावरी खोऱ्यात वळविण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले.

शिर्डी विमानतळाजवळील काकडी येथे ‘शासन आपल्या दारी’ या अभियानाच्या जिल्हास्तरीय कार्यक्रमात शासकीय योजनांच्या लाभांचे लाभार्थ्यांना मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात आले. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते‌. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसुल, पशुसंवर्धन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, खासदार सदाशिवराव लोखंडे, खासदार डॉ.सुजय विखे पाटील, आमदार सर्वश्री प्रा.राम शिंदे, सत्यजित तांबे, बबनराव पाचपुते, मोनिका राजळे, किरण लहामटे, आशुतोष काळे, अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले, महानंदाचे अध्यक्ष राजेश परजणे, जिल्हा परिषद सदस्य शालीनी विखे पाटील आदी यावेळी उपस्थित होते.

‘शासन आपल्या दारी’ अभियानात अहमदनगर जिल्ह्यात २४ लाख नागरिकांना योजनांचा लाभ देण्यात येत आहे‌. यापैकी ३० हजार लाभार्थी आज येथे उपस्थित आहेत, असे नमूद करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, आजच्या या कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे. आजपर्यंत या कार्यक्रमाच्या माध्यमातून राज्यातील १ कोटी ४० लाख लाभार्थ्यांना लाभ मिळाला आहे. सरकारी काम आणि सहा महिने थांब ही संकल्पना आम्ही थांबविली आहे‌. नागरिकांना चकरा माराव्या लागू नये, यासाठी शासन काम करत आहे. एकाच छताखाली अनेक योजनांचा लाभ मिळत आहे. जिल्ह्यात लाभार्थ्यांना ३ हजार ९८२ कोटींचा लाभ देण्यात आला आहे.

राज्यातील अनेक योजनांना आर्थिक पाठबळ देण्याचे काम केंद्र शासनाने केले आहे. राज्याच्या विकासासाठी शासन झोकून देऊन काम करत आहे. आजही राज्यातील निम्म्या साखरेचे उत्पादन अहमदनगर जिल्ह्यातून होत आहे. अहमदनगर जिल्ह्याला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर नाव देण्याचा ऐतिहासिक निर्णय शासनाने घेतला आहे. समृध्दी महामार्गामुळे शिर्डी व परिसराच्या विकासाचे नवे पर्व सुरू होत आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढे म्हणाले की, राज्यातील सर्व शासकीय रूग्णालयात आता मोफत उपचार मिळत आहे. महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजनेत साडेबारा कोटी जनतेला पाच लाखांपर्यंत मोफत उपचार देण्याचा ऐतिहासिक निर्णय शासनाने घेतला आहे. ५३ वर्षांपासून रखडलेला निळवंडे प्रकल्प मार्गी लावण्याचे काम शासनाने केले आहे. शासनाने ३५ सिंचन प्रकल्पांना प्रशासकीय मान्यता नव्याने दिली आहे. राज्यात मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधा निर्माण होत आहेत. सध्या राज्यात पावसाने ओढ दिली आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार खंबीरपणे उभे आहे, असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

सरकार शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडवणार नाही – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

अहमदनगर जिल्ह्यामध्ये ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून 24 लाख लाभार्थ्यांपर्यंत शासन पोहचले असून ३हजार ९०० कोटी रुपयांचा लाभ एकट्या नगर जिल्ह्यातील लाभार्थ्यांना मिळाला आहे. नमो शेतकरी सन्माननिधीत आता शेतकऱ्यांना वर्षाला १२ हजारांची मदत मिळत आहे.जिल्ह्यात फक्त एक रूपयात १२लाख शेतकऱ्यांचा पीक विमा उतरविण्यात आला आहे. राज्यात दुर्दैवाने दुष्काळ आला तर यावेळी सर्वच शेतकऱ्यांनी विमा उतरवलेला आहे. त्यामुळे सरकारची मदत , विम्याची मदत असेल या सगळ्या गोष्टी शेतकऱ्यांपर्यंत शासन पोहोचविणार असून सरकार शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, शेतकऱ्यांना वर्षभर दिवसा बारा तास वीज मिळाली पाहिजे म्हणून मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी हा कार्यक्रम शासनाने हाती घेतलेला आहे. या कार्यक्रमांमध्ये नगर जिल्ह्यांने आघाडी घेतली असून कदाचित अहमदनगर जिल्हा पूर्णपणे सोलर जिल्हा होणारा राज्यातील पहिला जिल्हा ठरणार आहे.

सहकारी साखर कारखान्यांना शासनाच्या धोरणामुळे बळ – उपमुख्यमंत्री अजित पवार

राज्यातील सहकारी चळवळीला आर्थिक मदत व गती देण्याचे काम केंद्र सरकारच्या धोरणामुळे मिळाले आहे. राज्यातील सहकारी साखर कारखान्याचा साडेनऊ हजार कोटींचा आयकर माफ करण्याचा निर्णय केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी घेतला. यामुळे जिल्ह्यात साखर कारखान्यांना मोठे बळ मिळाले आहे. साखर कारखान्यांनी आता नुसते साखर उत्पादन न करता इथेनॉल निर्मितीवर भर दिला पाहिजे, असेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

उपमुख्यमंत्री अजित पवार पुढे म्हणाले की, पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे प्रकल्पासाठी शासन प्रयत्नशील आहे. मुंबई-शिर्डी वंदे भारत रेल्वे सुरू झाली आहे. शिर्डी विमानतळावर नाईट लँडिग लवकरच सुरू होणार आहे. नागपूर-शिर्डी तसेच शिर्डी ते भरवीर पर्यंत समृध्दी महामार्गाची वाहतूकही सुरू झाली आहे.   

लम्पी निवारणासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार – पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

एक रुपयात शेतकऱ्यांना विमा उपलब्ध करुन देणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य आहे, ही अभिमानाची बाब आहे. पशुधनासाठी शासनाने आतापर्यंत १७० कोटी रूपये खर्च केले आहेत. लम्पी निवारणासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. लम्पी आजारासाठी लागणाऱ्या मदतीसाठी शासन सदैव शेतकऱ्यांशी पाठीशी आहे. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती व हर घर जल या योजनेत अहमदनगर जिल्हा आघाडीवर आहे. आजच्या ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमात येणाऱ्या सर्वांसाठी जांभळाचे रोप भेट देण्यात आले असून त्यांचे संगोपन करावे, असे आवाहनही महसूलमंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी यावेळी केले.

यावेळी मुख्यमंत्र्यांसोबत प्रातिनिधिक स्वरूपात २५ लाभार्थ्यांना व्यासपीठावर बसण्याची संधी मिळाली. यामध्येबबनराव गोविंदराव कबाडी (पुणतांबा ता. राहता) वैभव चंद्रकांत कांबळे (चिखलनवाडी ता.नेवासा) सौरभ दादासाहेब दौले (नेवासा) जया भास्कर पालवे (सावेडी, अहमदनगर) प्रफुल्ल भाऊसाहेब साळवे (राहुरी), हिराबाई ज्ञानदेव हळनूर, (पुरंपूर ता. श्रीरामपूर) बालासाहेब नानासाहेब गव्हाणे (रांजणगाव देशमुख ता. कोपरगाव) सुधाकर घोरपडे (मुंगी ता. शेवगाव) पद्मा रोहिदास माळी, (कोपरगाव) भारती दीपक वाडेकर (संगमनेर) संजय नानाभाऊ कडूस (सारोळा ता. अहमदनगर), सीमा शब्बीर इनामदार (लोणी), मुक्ता अर्जुन धोत्रे (बाभळेश्वर ता. राहता), गोरख बाबुराव शिंदे (येळपणे ता. श्रीगोंदा), मिलिंद लक्ष्मण शिंदे (पिंपरखेड ता.जामखेड), लक्ष्मण मोघा केदार (चिकलठाणा ता. राहुरी), राधाबाई मोहन देशमुख (अकोले), सुभाष त्रिंबक साळवे(शेवगाव), दानिश सलीम तांबोळी (माळीवाडा, अहमदनगर), योगेश जगन्नाथ घोलप, मोहिनी वीरेश पाचपुते (काष्ठी ता. श्रीगोंदा), अंबिका मल्हार (पारनेर), शकुंतला अरविंद आहेर आणि विष्णू लक्ष्मण शिंगटे (वाघोली ता. शेवगाव) यांचा समावेश होता. या सर्व लाभार्थ्यांचा लाभाचे प्रमाणपत्र व धनादेश देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी अहमदनगर जिल्ह्याने विविध योजनांच्या माध्यमातून दिलेल्या लाभांची माहिती देणारी दृकश्राव्य चित्रफित दाखविण्यात आली. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे पैठणीचा फेटा परिधान करून तसेच साईबाबांची मूर्ती, ज्ञानेश्ववरील ग्रंथाची प्रत देऊन स्वागत करण्यात आले. व्यासपीठावर याप्रसंगी विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरिक्षक बी. जी. शेखर पाटील, जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, महानगरपालिका आयुक्त डॉ.पंकज जावळे आदी अधिकारी यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ यांनी केले‌.

यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कृषी आणि कामगार विभागाच्या लाभार्थीना कामगार किट, टॅक्टरचे वाटप करण्यात आले. जिल्ह्यातून आलेल्या सरपंचाशीही मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यासपीठावरून खाली येत प्रत्यक्ष संवाद साधला.

मुख्यमंत्र्यांनी केली हार्वेस्टिंग मशीनची पाहणी

जिल्हास्तरीय कार्यक्रमाच्या समारोपानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः व्यासपीठावरून खाली येऊन शेतकऱ्यांना पॉवर टिलर व ट्रॅक्टर वाटप करण्यासाठी गेले. त्याठिकाणी त्यांना महाडीबीटी योजनेत एका लाभार्थ्यांला मिळालेले हार्वेस्टिंग मशीन दिसले. मुख्यमंत्र्यांनी स्वतः या मशीनजवळ जाऊन मशीनची पाहणी केली व वैशिष्टये जाणून घेतले. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हे ही उपस्थित होते.

कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी, मुख्यमंत्री जनकल्याण कक्षाचे अमोल शिंदे यांनी माहिती दिली. प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा जनकल्याण कक्ष सुरु करण्यात आले‌ आहेत‌. यामाध्यमातून जनकल्याण योजनांचा सर्वसामान्यांना लाभ दिला जात आहे. असे त्यांनी यावेळी सांगितले.

एका छताखाली ८० शासकीय विभागांचे माहितीचे स्टॉल

शासन आपल्या दारी अभियानाच्या जिल्हास्तरीय कार्यक्रमात विविध शासकीय विभागांचे ८० स्टॉल उभारण्यात आले होते. या माध्यमातून नागरिकांना विविध शासकीय योजनांची माहिती एकाच छताखाली मिळत मिळाल्यामुळे या प्रदर्शनास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. मुख्यमंत्री तक्रार कक्षाच्या माध्यमातून नागरिकांच्या लेखी समस्या, तक्रारींची दाखल करून घेऊन त्यांना टोकन नंबर देण्यात आले. यावेळी जिल्हा कौशल्य व उद्योजकता विभागाने घेतलेल्या रोजगार मेळाव्यास तरूणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

मराठा समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक विकासासाठी गठीत मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक संपन्न

Fri Aug 18 , 2023
मुंबई :- मराठा समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक विकासासोबतच मराठा आरक्षण आणि सुविधांसाठी शासन सकारात्मक आहे. दि.९ सप्टेंबर २०२० ते ५ मे २०२१ दरम्यान सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्ग (एसईबीसी) मधून आर्थिकदृष्ट्या मागास वर्ग (ईडब्ल्यूएस) विकल्प घेतलेल्या उमेदवारांच्या नियुक्ती संदर्भात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. याबाबत शासन सकारात्मक पाठपुरावा करेल, असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com