– लोहमार्ग पोलिसांनी 24 तासात घेतला शोध
नागपूर :-भाकरीच्या शोधात निघालेला 13 वर्षांचा मुलगा अचानक बेपत्ता झाला. लोहमार्ग पोलिसांनी त्याचा 24 तासात शोध घेतला. मुलाला पाहताच पालकांच्या डोळ्यात आनंदाश्रृ तरळले. हा प्रकार नागपूर रेल्वे स्थानकावर घडला.
नवागाव खुर्द, छत्तीसगढ येथील रहिवासी कामत साहू (37), पत्नी तारणी साहू (30) काम मिळेल या आशेवर नागपुरात आले. 5 वर्षाचा मनन आणि 13 वर्षाचा जितेंद्र या दोन्ही मुलांना सोबत आणले. त्यांना कंत्राटदाराने बोलाविले होते. चौघेही नागपूर रेल्वेस्थानकावर थांबले. मात्र, कंत्राटदार आलाच नाही. त्यांच्याकडे कंत्राटदाराचा मोबाईल नंबरही नव्हता. दरम्यान त्यांच्या जवळील खाद्यपदार्थही संपले. त्यामुळे पोट भरण्याचा त्यांच्या समोर प्रश्न होता. कधी प्रवाशांनी दिलेल्या भाकरीवर तर कधी टेकडीच्या गणेश मंदिरात जावून पोटाची खळगी भरायचे. अशा पध्दतीने तीन कंत्राटदाराची प्रतिक्षा केली. तरी सुध्दा कंत्राटदार आला नाही.
दरम्यान शुक्रवारच्या रात्री जितेंद्रला भुक लागली. भोजनासाठी तो निघाला. मात्र नवीन ठिकाण असल्याने त्याला रस्ता गवसला नाही. आई वडिलांना मुलगा दिसत नसल्याने त्यांनी सर्वत्र शोध घेतला. अखेर दुसर्या दिवशी दुपारी त्यांनी लोहमार्ग पोलिस ठाणे गाठले. एएसआय ऑज्वेल्ड थॉमस यांनी तक्रार नोंदविली. मुलाचा शोध घेण्यासाठी एएसआय राजेश झुरमुरे, बाबुसिंग ठाकूर, प्रफुल्ल लांजेवार, दीपाली स्वामी आणि हिंगनापूरे निघाले. त्यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले असता जितेंद्र स्टेशन बाहेर पडताना दिसला. पोलिसांनी सर्वत्र शोध घेतला. अखेर रात्री 10 वाजताच्या सुमारास तो स्टेशन बाहेर एका ठिकाणी बसून दिसला. पोलिसांनी त्याच्या आई वडिलांना बोलाविले. जितेंद्रला पाहताच पालकांच्या डोळ्यात आनंदाश्रृ तरळले. पोलिसांनी कायदेशिर कारवाई नंतर जितेंद्रला त्याच्या पालकाच्या स्वाधीन केले. पोलिसांनी त्यांना छत्तीसगढला जाणार्या गाडीत बसवून दिले. साहू दाम्पत्यांनी पोलिसांचे आभार मानले. ही कारवाई पोलिस निरीक्षक मनीषा काशीद यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली.