नागपूर :- नक्षलवाद्यांना राष्ट्रविघातक कार्यात मदत केल्याचा आरोप असलेल्या प्रा. जी. एन. साईबाबाच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाच्या आजच्या निकालामुळे शहीदांच्या कुटुंबीयांना दिलासा मिळाला असून, या निर्णयाचे आपण स्वागत करतो, असे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
नागपूर येथे ते आज पत्रकारांशी बोलत होते. प्रा. जी. एन. साईबाबाच्या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने काल दिलेला निकाल सर्वोच्च न्यायालयाने आज स्थगित केला आहे. नागपूर खंडपीठाचा यासंदर्भातील निकाल आश्चर्यजनक आणि धक्कादायक होता. समाज आणि राष्ट्रविरोधी कार्यात माओवाद्यांना थेट मदत केल्याचे इतके पुरावे असताना केवळ तांत्रिक मुद्यावर आरोपीला सोडून देणे, हे चुकीचेच होते. कालच्या काल आम्ही सर्वोच्च न्यायालयात गेलो कारण, शहीदांच्या कुटुंबीयांसाठी हा निर्णय अतिशय क्लेशदायक होता. सर्वोच्च न्यायालयाने कालच खंडपीठ गठीत करुन आज त्यावर तातडीने सुनावणी घेतली, याबद्दल मी सर्वोच्च न्यायालयाचे मनापासून आभार मानतो. जे पोलिस आणि जवान नक्षलवाद्यांशी लढताना शहीद झाले, त्यांच्या कुटुंबीयांना दिलासा देणारा हा निकाल आहे. सारे पुरावे उच्च न्यायालयात सादर केल्यानंतर सुद्धा केवळ खटल्याच्या परवानगीचे तांत्रिक कारण सांगत ही सुटका झाली होती. आता यापुढे कायदेशीर लढाई होत राहील आणि साऱ्या बाबी आम्ही सर्वोच्च न्यायालयात मांडू, असेही देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना सांगितले.