मुंबई :- राज्यातील ग्रामीण भागात प्रत्येक कुटुंबाला पाणी देणे हे शासनाचे कर्तव्य आहे. यामुळे ‘हर घर नलसे जल’ या उद्देशाने प्रत्येक कुटुंबाला पाणी मिळण्यासाठी राज्यात सुरू असलेली जलजीवन मिशनची कामे कालमर्यादेत पूर्ण करण्याचे निर्देश पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी आज दिले.
मंत्रालयातील दालनात राज्यातील जलजीवन मिशनबाबत आढावा बैठकीत मंत्री पाटील बोलत होते. यावेळी पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे, जलजीवन मिशनचे अभियान संचालक ई.रवींद्रन, सहसंचालक श्रीकांत अनारसे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे मुख्य अभियंता सुभाष भुजबळ,आदी उपस्थित होते.
मंत्री पाटील म्हणाले, राज्यातील ग्रामीण जनतेला पाणीटंचाई भासू नये, यासाठी जिल्हा परिषद आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणांतर्गत जलजीवन मिशन सुरू करण्यात आले आहे. राज्यातील 1 कोटी 46 लाख 71 हजार 918 कुटुंबापैकी 1 कोटी 25 लाख 98 हजार 195 कुटुंबांना नळ जोडणी देऊन पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. शाळा, अंगणवाड्यांनाही 99 टक्के नळजोडणी देण्यात आली आहे. जलजीवन मिशनचे सुधारित प्रस्ताव त्वरित पाठविण्याच्या सूचनाही श्री. पाटील यांनी यावेळी केल्या. शिवाय राज्यभरातून सुधारित प्रस्तावासाठी आणि कामे मिशन मोडवर पूर्ण होण्यासाठी प्रत्येक विभागांतर्गत शिबीरे आयोजित करावीत.
अमरावती, सिंधुदुर्ग जिल्ह्यासह अन्य जिल्ह्यात जिथे निधीची कमतरता आहे, तिथे त्वरित निधी वितरित करावा. जिल्हा परिषदस्तरावर कामे वेगाने होण्यासाठी गट स्थापन करावेत. येत्या एक महिन्यामध्ये योजनेला गती देण्याचे निर्देशही मंत्री पाटील यांनी दिले.
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणासाठी ज्या जिल्ह्यांची निधीची मागणी आहे, त्यांना निधी देण्यात येणार असून महिन्याभरात कामांना सुरळितपणा आणण्याची ग्वाही प्रधान सचिव खंदारे यांनी दिली.
राज्यात यावर्षी आतापर्यंत 1 लाख 5206 नळजोडणी केली तर 17221 गावे हर घर जल म्हणून घोषित केल्याची माहिती यावेळी देण्यात आली.