विश्वासघाताचं राजकारण केल्यामुळे मतदारांनी शरद पवारांना हद्दपार केलं – मुंबई भाजपा अध्यक्ष ॲड. आशिष शेलार यांचा हल्लाबोल

मुंबई :-विश्वासघाताच्या राजकारणाचे जनक असलेल्या शरद पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर टीका करताना आपला तोल गमावला आहे. विश्वासघाताचं आणि खंजीर खुपसण्याचं राजकारण आजवर केल्यामुळेच महाराष्ट्राच्या मतदारांनी तुम्हाला हद्दपार केलं, असा घणाघाती हल्ला मुंबई भाजपाचे अध्यक्ष आणि राज्याचे माहिती तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांनी मंगळवारी चढवला. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत शेलार बोलत होते. यावेळी प्रदेश भाजपा समन्वयक विश्वास पाठक आणि भाजपाचे प्रदेश माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन उपस्थित होते.

शेलार म्हणाले की, ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी ‘पुलोद’च्या निर्मितीबाबत बोलताना आपण जनसंघाच्या बळावर मुख्यमंत्री झालो हे मान्य केलं. मात्र हे सरकार बनवण्याआधी विश्वासघाताचे आणि खंजीर खुपसण्याचं कोणते विचारमंथन तुम्ही केलं होते, कोणाच्या विरोधात केलं होते हे सत्य ही महाराष्ट्राच्या जनतेपुढे येऊ द्या.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना न्यायालयीन प्रक्रीयेद्वारे निर्दोषत्व मिळाले आहे. मात्र न्यायालयाच्या निर्णयाकडे दुर्लक्ष करून अमित शाह यांच्यावर तुम्ही टीका करणार असाल तर ‘लवासा’ पासून अनेक प्रकरणांमध्ये न्यायालयाने कोणाकडे बोट दाखवले आहे हे बोलण्याची वेळ येऊ देऊ नका असेही, शेलार म्हणाले.

शेलार यांनी सांगितले की, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर टीका करताना पवार साहेबांचा राजकीय न्यूनगंड दिसून आला आहे त्यामुळेच ते शाह यांच्यावर अशा भाषेत टीका करत आहेत.

पवार यांनी विश्वासघाताच्या राजकारणाचे प्रशिक्षण उद्धव ठाकरे यांना दिले आहे, हे 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर दिसून आले आहे. या विश्वासघाताच्या राजकारणाला महाराष्ट्राच्या जनतेने यावेळी मतपेटीतून उत्तर दिले आहे. सत्तेच्या लोभासाठी एकत्र आलेली ही महाविकास आघाडी एक्सपायरी डेट संपल्याने केव्हाही फुटण्याची शक्यता आहे असेही शेलार यांनी नमूद केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

चंद्रपुरातून सुरू होणारी 'क्लायमेट चेंज'ची चळवळ देशव्यापी व्हावी- आ. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला मानस

Wed Jan 15 , 2025
– ‘इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन क्लायमेट चेंज’ १६ जानेवारीपासून चंद्रपूर :- येथे तीन दिवसांच्या कॉन्फरन्समध्ये पुढील ३० वर्षांच्या पर्यावरणाची बिजे रोवली गेली पाहिजे. तसेच ‘क्लायमॅट चेंज’ ही चंद्रपुरातून सुरू होणारी चळवळ देशव्यापी व्हायला हवी, अशी अपेक्षा राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली. पर्यावरण जागृतीसाठी जागतिक स्तरावरील ही परिषद चंद्रपूर येथे होत असल्याचा नक्कीच […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!