– 27 ते 29 जानेवारी 2024 दरम्यान ‘खासदार औद्योगिक महोत्सव – अॅडव्हान्टेज विदर्भ’ चे नागपुरात आयोजन
नागपूर :- विदर्भाला सर्वच क्षेत्रांमध्ये आत्मनिर्भर करण्यासाठी औद्योगिक विकास महत्त्वाचा आहे याच हेतूने विदर्भातील औद्योगिक क्षमता विकसित करणे ,तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, स्टार्टअप्स आणि उद्यमशीलतेला चालना देणे, विक्रेता विकासाच्या संधी उपलब्ध करून देणे, नवीन तंत्रज्ञानाचा परिचय करून देणे, रोजगारासाठी नवकल्पना आणि पोषक वातावरण निर्माण करणे आणि यशस्वी उद्योजकाच्या यशोगाथा प्रदर्शित करण्यासाठी नागपूर मध्ये येत्या 27 ते 29 जानेवारी दरम्यान खासदार औद्योगिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती नागपूरचे खासदार आणि केंद्रीय रस्ते वाहतूक महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज नागपूरमध्ये पत्रकार परिषदेत दिली.
असोसिएशन ऑफ इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट (एड) तर्फे आयोजित ‘खासदार औद्योगिक महोत्सव – 27 जानेवारी ते 29 जानेवारी 2024 या कालावधीत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या, जमनालाल बजाज प्रशासकीय इमारत परिसर, अमरावती रोड, नागपूर येथे होणार आहे. खासदार औद्योगिक महोत्सवाच्या अंतर्गत नागपुरात प्रथमच हे आयोजन करण्यात आले आहे. विदर्भातील सर्वात मोठा इंडस्ट्रियल एक्स्पो, बिझनेस आणि इन्व्हेस्टमेंट कॉन्क्लेव्ह या माध्यमातून बघायला मिळणार आहे.
याप्रसंगी नितीन गडकरी यांनी विदर्भातील कापूस आणि संत्रा उत्पादक शेतकऱ्यांकरिता वर्धा येथे होत असलेल्या सिंदी ड्राय पोर्टचे महत्व अधोरेखित केले . कापसाच्या गाठीची थेट बांग्लादेशला हल्दीया बंदराच्या माध्यमातून वाहतूक झाल्यास विदर्भातील कापूस उत्पादकांचा वाहतूक खर्च वाचेल आणि त्यांना प्रतिक्विंटल आर्थिक लाभ होईल . कुही येथे अडीच हजार एकर जमीन ही एमआयडीसीची असून या जमिनीवर जर सांडपाण्यावर प्रक्रिया करून पाणी उपलब्ध केले तर येथे पेट्रोल रिफायनरीचीही क्षमता निर्माण होईल .
पेट्रोल डिझेल ला पर्याय ठरू पाहणाऱ्या मिथेनचे साठे चंद्रपूरच्या भद्रावती मध्ये आहे . त्याचा सुद्धा उपयोग औद्योगिक वाढीसाठी होईल असे गडकरी यांनी स्पष्ट केले . बुटीबोरीत मदर डेअरी चा साडेचारशे कोटीचा प्रकल्प होणार असून नागपुरात असणारे विविध उद्योग समूह चांगली कामगिरी करत आहे असे त्यांनी सांगितलं . राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर युनिव्हर्सिटी ,लक्ष्मीनारायण तंत्रज्ञान संस्था , व्हिएनआयटी , आय आयएम तसेच इतर शैक्षणिक संस्थांचा देखील या औद्योगिक महोत्सवात सहभाग राहणार असून इंडस्ट्री -अकॅडमी कनेक्ट यांच्या माध्यमातून अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या उद्योगाबद्दल माहिती मिळणार आहे .तीन दिवसीय खासदार औद्योगिक महोत्सवात विदर्भातील सर्व जिल्ह्यातील विविध औद्योगिक संघटनांचे प्रतिनिधीही उपस्थित राहणार आहेत ,अशी माहिती गडकरींनी यावेळी दिली .
‘अॅडव्हान्टेज विदर्भ ‘ च्या माध्यमातून गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी आणि उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर एक्स्पो, कॉन्क्लेव्ह, परिसंवाद यासारखे नियमित उपक्रम आयोजित करण्यात येणार आहेत .कापड, प्लास्टिक, खनिजे, कोळसा, मिथेनॉल/इथेनॉल, पर्यटन, विमान वाहतूक, लॉजिस्टिक, आयटी, आरोग्य, फार्मा, रेडिमेड, रत्ने आणि दागिने, इमारती लाकूड, बांबू, कोल्ड स्टोरेज, सार्वजनिक चाचणी प्रयोगशाळा, मनोरंजन, शिक्षण, कृषी उपकरणे, संरक्षण, बियाणे/कृषी प्रक्रिया, , मत्स्यपालन, ऊर्जा, सौर, कागद आणि संबंधित उद्योग, खाणकाम, पोलाद आणि संबंधित उद्योग, रिअल इस्टेट, तेल शुद्धीकरण इत्यादी क्षेत्रातील तज्ज तसेच व्यावसायिक या ३ दिवसीय औद्योगिक महेत्सवात सहभागी होत आहेत.
‘खासदार औद्योगिक महोत्सव – अॅडव्हांटेज विदर्भ’ स्थानिक उद्योगांना चालना देणारा ठरणार आहे .या शिवाय याठिकाणी तज्ज्ञ मंडळी सोबत संवाद, विविध उद्योग केंद्रित सत्र आयोजित करण्यात आली आहेत. गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी
तीन दिवस चालणाऱ्या या महोत्सवात एकूण 20 व्यावसायिक सत्रे असतील. ही व्यावसायिक सत्रे विविध औद्योगिक क्षेत्रे, व्यवसाय आणि उद्योजकांसाठी आयोजित केली जातील. तसेच एकूण 240 स्टॉल्स असतील त्यापैकी 90% स्टॉल विदर्भातील कंपन्यांसाठी सवलतीच्या दरात राखीव असतील.
आयोजक संस्था – असोसिएशन फॉर इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट – एडने सविस्तर माहितीसाठी www.advantagevidharbha.in ला भेट देण्याचे आवाहन केले आहे.