नागपूर :- मतदारांच्या मनात आपल्या राष्ट्रीय कर्तव्याची जाणीव निर्माण व्हावी तसेच येत्या २० नोव्हेंबर रोजी जास्तीत जास्त संख्येत घराबाहेर पडून नागरिकांनी लोकशाहीच्या उत्सवात आपले भरीव योगदान द्यावे, याकरीता स्वीप अंतर्गत मनपाद्वारे आयोजित करण्यात आलेल्या फ्लॅश मॉब च्या माध्यमातून शेकडो नागरिकांनी मतदान जनजागृती प्रतिज्ञा घेत, ” एक वोट से फर्क पड़ता है” म्हणत पथनाट्य द्वारे मतदानाचा जागर केला.
सिस्टिमेटिक व्होटर्स एज्यूकेशन अँड इलेक्ट्रॉल पार्टीसिपेशन अर्थात ‘स्वीप’ कार्यक्रमांतर्गत नागपूर महानगरपालिकाद्वारे बुधवारी (ता.30) सकाळी मेडिकल चौक येथील व्हीआर नागपूर येथे मतदार जनजागृती करीता फ्लॅश मॉब आणि पथनाट्याचे सादरीकरण करण्यात आले.
याप्रसंगी नागपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी, मनपाचे अतिरिक्त आयुक्त अजय चारठाणकर, उपायुक्त डॉ रंजना लाडे, परिवहन व्यवस्थापक विनोद जाधव, सहाय्यक आयुक्त प्रमोद वानखेडे, घनश्याम पंधरे, सहायक अधीक्षक राजकुमार मेश्राम, जनसंपर्क अधिकारी मनीष सोनी, क्रीडा अधिकारी डॉ. पियुष आंबुलकर यांच्यासह मनपा व जिल्हा परिषदचे अधिकारी, कर्मचारी व मनपा शाळेचे विद्यार्थी प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी अतिरिक्त आयुक्त अजय चारठाणकर यांनी नागपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी यांचा मनपाचा मनाचा दुपट्टा देऊन स्वागत केले.
यावेळी मार्गदर्शन करीत नागपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी यांनी, नागपूर सारख्या सांस्कृतिक शहरात कमी मतदान होणे हे चिंतेची बाब आहे, नागरिकांनी आपले राजकीय कर्तव्य बजावत, अधिकाधिक संकेत मतदान करावे आणि इतरांना देखील मतदानासाठी प्रोत्साहित करावे असे आवाहन केले. यावेळी मनपाचे जनसंपर्क अधिकारी मनीष सोनी यांनी उपस्थितांना मतदानाची शपथ दिली. शेकडो नागरिकांनी एक स्वरात शपथ घेत मतदानात आमचा सक्रिय सहभाग असणार असल्याची ग्वाही दिली.
विधानसभा निवडणुकीमध्ये नागपूर शहरातून जास्तीत जास्त मतदान व्हावे याकरिता मॅट्रिक्स वॉरियर्सच्या स्वयंसेवकांद्वारे फ्लॅश मॉब व पथनाट्याचे सादरीकरण करण्यात आले. मॅट्रिक्स वॉरियर्सच्या स्वयंसेवकांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा, देशभक्तीपर गीत अशा विविध गीतांमधून नागरिकांचे लक्ष वेधले व पुढे ‘मतदान कर…’ अशी साद देखील घातली. तसेच पथनाट्याद्वारे मतदान का आवश्यक आहे, हे देखील पटवून दिले.
मॅट्रिक्स वॉरियर्स संस्थेतर्फे पथनाट्याचे लेखन नंदिनी मेनजोगे यांनी केले तर संकल्पना आदित्य खोब्रागडे यांची होती. संस्थेचे आकाश निखाडे, सर्वेश हरडे, सुजाता कावरे, संजना मानवटकर, कुणाल पवार, नयन हावरे, जान्हवी वांढरे, वृषाली भानारे, साक्षी सारडा, आचल पौनीकर, समीक्षा जंगले या स्वयंसेवकांनी पथनाट्य व फ्लॅश मॉब मध्ये सहभाग नोंदविला. नागरिकांनी देखील या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शविला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी मनीष सोनी यांनी तर आभार डॉ. पियुष आंबुलकर यांनी व्यक्त केले.