*महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड*
*(नागपूर मेट्रो रेल प्रकल्प)*
नागपूर :- भारतीय प्रशासकीय सेवेच्या (आयएएस) प्रोबेशनर्स अधिकाऱ्यांनी आज मेट्रो भवनला भेट दिली. २०२२-२३ बॅचच्या या अधिकाऱ्यांनी मेट्रो प्रकल्पाच्या पायभरणीपासून ते पायाभूत सुविधांमध्ये गाठलेल्या सर्वोच्च शिखरापर्यंतची इत्यंभूत माहिती सादारीकरणाद्वारे तसेच प्रत्यक्ष भेटीतून घेतली.
या आयएएस अधिकाऱ्यांचा प्रशिक्षणाअंतर्गत सध्या महाराष्ट्र दर्शन टप्पा दोन सुरू असून ते विदर्भ दर्शनाच्या अंतर्गत प्रशिक्षणासाठी नागपुरात आले आहेत. मेट्रो प्रकल्पाची प्रत्यक्ष झलक पाहण्यासाठी आणि त्याचे मूलभूत कामकाज समजून घेण्यासाठी त्यांनी आज मेट्रोभवनला भेट दिली. महा मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर तसेच संचालक (स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग) अनिल कोकाटे यांनी या अधिकाऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले. या अधिकाऱ्यांनी मेट्रोभवनमधील विविध विभागांना भेटी दिल्या.
एक्सपरियन्स सेंटर, प्रकल्प प्रदर्शन, वाचनालय, मेट्रो भवनच्या वर्तुळाकार गॅलरीबाबत या अधिकाऱ्यांनी उत्सुकतेने माहिती घेतली. त्यांना महामेट्रोचे ऑपरेशनल कंट्रोल सेंटर (ओसीसी) देखील दाखवण्यात आले. या अधिकाऱ्यांना ट्रेनचे कामकाज आणि ऑपरेशनल कंट्रोल सेंटरच्या इतर बाबीबाबत मार्गदर्शन करण्यात आले. मेट्रो ऑपरेशन्सच्या 6-डी बीम मॉडेल, गेल्या काही वर्षांमध्ये साध्य केलेली प्रगती, अंमलबजावणीदरम्यानची आव्हाने इत्यादींचे सादरीकरण करण्यात आले.
महामेट्रोला मिळालेले पुरस्कार आणि गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमधील उपलब्धी, आशिया आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्सची माहिती या आयएएस अधिकाऱ्यांना देण्यात आली. सिंगल पिअरवरील डबल डेकर उड्डाणपूलामुळे साध्य होणारी शाश्वतता, प्रकल्पाच्या खर्चात बचत सुनिश्चित करणारे विविध नाविन्यपूर्ण उपक्रम, नॉन-फेअर बॉक्स रेव्हेन्यूला चालना देण्यासाठी करण्यात येत असलेले प्रयत्न यासारख्या तसेच इतर प्रमुख समस्यांची माहिती त्यांना देण्यात आली. नवी मुंबईतील मेट्रो संचालन तसेच ठाणे मेट्रो प्रकल्पातील ठाणे रिंग मेट्रो प्रकल्पाबद्दल माहिती ऐकून अधिकारी विशेष प्रभावित झाले. एमडी हर्डीकर यांच्याशी अधिकाऱ्यांनी अनेक विषयांवर संवाद साधला. त्यांच्या शंकांचे निरसन करण्यात आले. महामेट्रोने साकारलेल्या प्रकल्पाचे या अधिकाऱ्यांनी खूप कौतुक केले. यावेळी सुवर्णा पांडे, संचालक (राज्य प्रशिक्षण धोरण) तसेच मिलिंद तारे (वरिष्ठ प्रशिक्षण समन्वयक) उपस्थित होते.