भंडारा :- सार्वत्रिक विधानसभा निवडणूक-2024 चे पार्श्वभूमीवर मुख्य निवडणूक निरीक्षक विजयकुमार गुप्ता यांचे अध्यक्षतेखाली निवडणूक निर्णय अधिकारी,60-तुमसर यांचे कार्यालयात आज उमेदवार व त्यांचे प्रतिनिधी यांची बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत दर्शन निकाळजे, निवडणूक निर्णय अधिकारी, 60-तुमसर, सहा.निवडणूक निर्णय अधिकारी, मोहन टिकले, तहसीलदार तुमसर, सहा.निवडणूक निर्णय अधिकारी, संदिप माकोडे, तहसीलदार मोहाडी, संपर्क अधिकारी प्रफुल्ल र.केळकर, बी.एस.पेंदाम, नायब तहसीलदार (निवडणूक),तुमसर आणि उमेदवार तसेच उमेदवारांचे प्रतिनिधी उपस्थित होते. या बैठकीत निवडणूक निरीक्षक यांनी उमेदवारांना निवडणूक प्रकियेबाबत महत्वपूर्ण सूचना आणि मार्गदर्शन केले. निवडणूक प्रक्रिया शांततामय आणि पारदर्शक पध्दतीने पार पाडण्याच्या दृष्टीने सर्वांनी नियमांचे पालन करुन सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.
निवडणूक प्रचारादरम्यान सभा,प्रचार आणि प्रसिध्दी यासारख्या सर्व उपक्रमांसाठी प्रशासनाची परवागी घेणे आवश्यक आहे, असे मुख्य निवडणूक निरीक्षक यांनी स्पष्ट केले. यासाठी वेळेवर अर्ज करणे व आवश्यक असलेल्या परवानग्या प्राप्त करणे आवश्यक आहे. प्रचारादरम्यान नियमांचे पालन करुन कोणत्याही प्रकारची अनुशासनबाहय कृती टाळावी, खर्चाचा दैनंदिन हिशोब दररोज सादर करावा, आयोगाने निश्चित करुन दिल्यानुसार उमेदवार / प्रतिनिधी यांनी काय करावे आणि काय करु नये या नियमाचे पालन करावे, तसेच छपाई करण्यात येणारे पत्रकांवर प्रिटींग प्रेसचे नाव, संख्या प्रकाशक ई.ची नोंद करावी, असे त्यांनी उमेदवार आणि प्रतिनिधींना सांगीतले. निवडणूकीशी निगडीत कोणत्याही प्रकारचे प्रश्न किंवा समस्या उद्भवल्यास निवडणूक निर्णय अधिका-यांशी संपर्क साधण्याचे आवाहन निरीक्षकांनी केले. यामुळे निवडणूक प्रक्रियेत कोणतेही गैरप्रकार होणार नाहीत, तसेच शंका आणि प्रश्न तात्काळ निराकरण करता येतील. तुमसर विधानसभा निवडणूक शांततेत पार पाडावी. आणि विधानसभा निवडणूकीत शांतता आणि सुशासनासाठी सर्वांना सहकार्याचे आवाहन केले. तसेच उमेदवार व त्यांचे प्रतिनिधी यांनी निवडणूक विभागाने वेळोवेळी दिलेल्या सुचनाचे पालन करावे. असे निवडणूक निरिक्षक विजयकुमार गुप्ता यांनी आवाहन केले.