मुंबईत ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र उभारण्यात येणार – मंत्री दीपक केसरकर

मुंबई :- भारतीय संस्कृतीत ज्येष्ठ नागरिकांचे स्थान नेहमीच मानाचे राहिले आहे, कारण ते परिवाराचा आधारवड असतात. ज्येष्ठांना त्यांच्या उर्वरित आयुष्यात सुरक्षित, आरोग्य सुविधायुक्त वातावरण देण्यासाठी शासन कायम त्यांच्या पाठीशी आहे. मुंबई शहरात महिनाभरात ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र सुरू करण्यात येणार असल्याचे, शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले.

ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत चर्चासत्राचे वर्ल्ड ट्रेड सेंटर येथे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी मंत्री केसरकर बोलत होते.

या कार्यक्रमास आमदार सदा सरवणकर, आमदार देवराव होळी,सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे,समाज कल्याण आयुक्त ओमप्रकाश बकोरिया, बार्टीचे महासंचालक सुनिल वारे, सहसचिव दि. रा. डिंगळे, ज्येष्ठ नागरिक महासंघाचे अध्यक्ष अण्णासाहेब टेकाळे आदी उपस्थित होते.

मंत्री दीपक केसरकर म्हणाले की, अमेरिकेतील न्यूयॉर्क येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र चालवली जातात. त्याच धर्तीवर मुंबईत अशी केंद्र सुरू करण्यात येणार असून ज्येष्ठांना ने-आण करण्यासाठी स्वतंत्र बसची व्यवस्था करण्यात येईल. या केंद्रात ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या आवडीनुसार दिवस घालवता येईल. शाळांमध्ये आजी- आजोबा दिवस हा उपक्रम आपण सुरू केला. यानिमित्त राज्यभर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. राज्य शासनाने पंच्याहत्तर वर्षांवरील नागरिकांना मोफत एसटी प्रवास सवलत सुरू केली आहे. संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेच्या अर्थसहाय्यात वाढ करण्यात आली आहे.

यावेळी 80 वर्षांवरील आजी-आजोबांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी उल्लेखनीय काम करत असलेल्या फेस्कॉम, हेल्पेज इंडिया, जनसेवा फाऊंडेशन या संस्थांचाही सत्कार करण्यात आला.

सचिव भांगे यांनी राज्य शासनामार्फत ज्येष्ठ नागरिकांसाठी राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांची माहिती यावेळी दिली.

कार्यक्रमाच्या सुरुवातीस डॉ. गिरीश राजाध्यक्ष यांनी ‘ज्येष्ठ नागरिकांचे आरोग्य’ व राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष निर्मला सामंत प्रभावळकर यांनी ‘ज्येष्ठ नागरिकांचे कायदे’ या विषयावर मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे केले तर आभार आयुक्त, समाज कल्याण ओमप्रकाश बकोरिया यांनी मानले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

कृषी, सामूहिक पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी नागरिकांनी सहभाग नोंदवावा - एमटीडीसीचे महाव्यवस्थापक चंद्रशेखर जयस्वाल

Fri Oct 6 , 2023
मुंबई :- शाश्वत कृषी आणि सामूहिक पर्यटनवाढीच्या दृष्टीने सकारात्मक प्रयत्न करणे गरजेचे आहे. यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ कार्य करित असून, नागरिकांनीही यासाठी सहभाग नोंदवावा, असे आवाहन महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे महाव्यवस्थापक चंद्रशेखर जयस्वाल यांनी केले. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने पर्यटन आणि हरित गुंतवणूक या विषयावर वेबिनारचे आयोजन केले होते. ‘कम्युनिटी बेस्ड टुरिझम – सगुणा बाग एक अनुभव’ यावर या […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!