अमरावती :- संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ ऑफिसर्स फोरमतर्फे सेवानिवृत्त होत असलेले उपकुलसचिव प्रमोद तालन यांचा विद्यापीठ अतिथीगृहामध्ये छोटेखानी कार्यक्रमात प्र – कुलगुरू डॉ. विजयकुमार चौबे, कुलसचिव डॉ. तुषार देशमुख यांच्या शुभहस्ते शॉल, श्रीफळ, पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी ऑफिसर्स फोरमचे अध्यक्ष शशिकांत रोडे, फोरमचे सचिव डॉ. विलास नांदुरकर, पदाधिकारी डॉ. नितीन कोळी, मंगेश वरखेडे, विक्रांत मालवीय, नासिर खान, आर. एम. नरवाडे, कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष अजय देशमुख, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. राजीव बोरकर आदि उपस्थित होते.
सत्कार प्रसंगी मनोगत व्यक्त करतांना प्रमोद तालन म्हणाले, 1984 पासून मी विद्यापीठाच्या सेवेत कार्यरत आहे. माझी 38 वर्षे सेवा झाली असून सेवा काळात संस्थेच्या विकासासह शैक्षणिक विकास व गुणवत्तावाढीसाठी प्रयत्न केले आहे. याशिवाय विद्याथ्र्यांना जास्तीत जास्त सेवा देण्याचा प्रयत्न केला असून सेवेतून मला समाधान व आनंद मिळाला आहे. सेवा काळात मला सर्वांचे सहकार्य लाभले. तसेच वरिष्ठांचे बहुमूल्य मार्गदर्शन मिळाल्यामुळे परिश्रमपूर्वक सेवा करता आली याचा मला अभिमान आहे.
कुलसचिव डॉ. तुषार देशमुख म्हणाले, तालन साहेबांच्या रुपाने प्रदिर्घ अनुभव असलेलं व्यक्तिमत्व सेवानिवृत्त होत आहे. त्यांच्या कामाची पध्दत, कायद्याचे ज्ञान वाखाणण्याजोगे आहे. निवडणूक सेलमध्ये ते सध्या कार्यरत असून सेवानिवृत्तीनंतरही या सेलच्या कार्यासाठी कार्यरत राहतील व आपली सेवा देतील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
अध्यक्षस्थानाहून बोलतांना प्र – कुलगुरू डॉ. विजयकुमार चौबे म्हणाले, विद्यापीठाच्या सेवेतून दिवसेंदिवस कर्मचारी आणि अधिकारी कमी होत आहे. तालन साहेबांच्या रुपाने अनुभवी असलेलं व्यक्तिमत्व सेवानिवृत्त होत असल्यामुळे अनुभवाची पोकळी प्रशासनात निर्माण झाली आहे. कर्मचारी सेवानिवृत्त होत आहे. शासनाकडून नव्याने पदे मंजूर होणे आवश्यक आहे. तालन साहेबांनी विद्यापीठात दिलेल्या सेवेबद्दल त्यांनी कौतुक केले व त्यांच्या भावी आयुष्याकरीता शुभेच्छा दिल्यात.
प्रास्ताविक ऑफिसर्स फोरमचे अध्यक्ष शशिकांत रोडे यांनी, तर संचालन व आभारप्रदर्शन फोरमचे सचिव तथा जनसंपर्क अधिकारी डॉ. विलास नांदुरकर यांनी केले.