-धरती माँ लोककल्याण सोसायटीसंदर्भात मनपात विशेष बैठक
नागपूर, ता.२७ : वाठोडा येथील खसरा क्रमांक १५७ येथील १९.१० एकर जागेमध्ये उभारण्यात आलेल्या धरती माँ लोककल्याण सोसायटी येथील रहिवाशी नागरिकांच्या नियमितीकरणासंदर्भात नागपूर सुधार प्रन्यासद्वारे पारित करण्यात आलेल्या ठरावाच्या अनुषंगाने भूखंडधारकांच्या नियमितीकरणासंदर्भात सकारात्मक निर्णय घ्या, असे निर्देश महापौर दयाशंकर तिवारी यांनी नासुप्र अधिका-यांना दिले.
मौजा वाठोडा खसरा क्रमांक १५७ येथील १९.१० एकर जागेतील प्लॉटधारक रहिवाश्यांच्या समस्येबाबत महापौरांनी विशेष बैठक घेतली. बैठकीत महापौर दयाशंकर तिवारी, पूर्व नागपूरचे आमदार कृष्णा खोपडे, नगरसेवक ॲड. धर्मपाल मेश्राम, नगरसेविका मनीषा कोठे, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, नागपूर सुधार प्रन्यासचे मुख्य अभियंता एस.एन. चिमुरकर, सहायक अभियंता बन्सोड, नासुप्रच्या विधी अधिकारी प्रियंका इरखेडे-राउत, मनपाचे सहायक विधी अधिकारी प्रकाश बरडे आदी उपस्थित होते.
बैठकीत प्रारंभी नगरसेवक ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी संपूर्ण विषयाची सविस्तर माहिती सादर केली. वाठोडा येथील खसरा क्रमांक १५७ येथील नागपूर सुधार प्रन्यासच्या जागेवर १२०० नागरिक घर बांधून राहत आहेत. या भागात रस्ते, पिण्याचे पाणी, सिवर लाईन आदी सुविधांचे विकास कामे करण्यात आली आहेत. नागपूर सुधार प्रन्यासतर्फे सदर रहिवाश्यांचे घर अतिक्रमणमध्ये असल्याचे नोटीस देण्यात आली आहे. या नोटीसमुळे नागरिकांमध्ये डोक्यावरचे छप्पर जाण्याची भीती निर्माण झाली असून या नागरिकांच्या सुरक्षेच्यादृष्टीने सकारात्मक निर्णय घेण्याची मागणी ॲड.धर्मपाल मेश्राम यांनी महापौरांकडे केली.
आमदार कृष्णा खोपडे यांनी सांगितले की, वाठोडा येथील खसरा क्रमांक १५७ येथील जागा ही नागपूर सुधार प्रन्यासने भूसंपादन करून लीजवर दिली. लीजवर देण्यात आलेल्या जागेवर धरती माँ लोककल्याण सोसायटी निर्माण करून प्लॉट विक्री करण्यात आली. यावेळी अनधिकृतरित्या प्लॉट पाडून विक्री केल्याप्रकरणी नासुप्रद्वारे कुठलीही कार्यवाही करण्यात आली नाही. २०१८ला तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०११च्या आधीपासून मनपा, नासुप्र, नझुल, महसूल व खासगी जागांवर निवास करीत असलेल्यांची रजिस्ट्री करण्याचा महत्वाचा निर्णय घेतला. राज्य शासनाच्या या शासन निर्णयाच्या अनुषंगाने वाठोडा येथील खसरा क्रमांक १५७ येथील प्लॉटधारकांना नियमित करण्यासंदर्भात वारंवार नासुप्रला पत्र देण्यात आले, असल्याचेही आमदार कृष्णा खोपडे यांनी सांगितले.
शासन निर्णयाच्या अनुषंगाने बफर झोनची सीमा ५०० मीटरवरून ३०० मीटर केल्यामुळे धरती माँ लोककल्याण सोसायटी बफर झोनमधून बाहेर आली. २७ ऑगस्ट २०१९ला नागपूर सुधार प्रन्यासच्या बोर्ड ऑफ डायरेक्टरच्या बैठकीत मौजा वाठोडा खसरा क्रमांक १५७ धरती माँ लोककल्याण सोसायटीद्वारे नासुप्रच्या जागेवरी अतिक्रमणकारी भूखंडधारकांचा प्रस्ताव नियमितीकरण करण्याचा ठराव पारित करण्यात आल्याचेही आमदार कृष्णा खोपडे यांनी सांगितले.
यासंपूर्ण चर्चेअंती महापौर दयाशंकर तिवारी यांनी यामागील कायदेशीर बाबींची माहिती विधी अधिका-यांकडून जाणून घेतली. नागरिकांच्या सुरक्षेच्यादृष्टीने तुर्तास अतिक्रमण कारवाई थांबविण्याचे निर्देश दिले. येथील रहिवाशांना कायदेशीर बाबीनुसार सुरक्षा कशी प्रदान करता येईल. याबाबत सकारात्मक विचार करून त्यांच्या नियमितीकरणाबाबतही निर्णय घेण्याचे निर्देश महापौर दयाशंकर तिवारी यांनी यावेळी दिले.