– विद्यार्थी, कर्मचाऱ्यांचा सत्कार
नागपूर :- नागपूर महानगरपालिका कर्मचारी सहकारी बँक पुढील दशकात स्थापनेची शंभर वर्षे पूर्ण करेल. या प्रदीर्घ प्रवासात कर्मचाऱ्यांनी योगदान दिल्यामुळेच बँकेने प्रगती केली. आणि त्याचवेळी बँकही कर्मचाऱ्यांच्या पाठिशी संकटाच्या काळात उभी राहिली, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. नितीन गडकरी यांनी आज (शुक्रवार) केले.
नागपूर महानगरपालिका कर्मचारी सहकारी बँकेच्या वतीने शैक्षणिक गुणवत्ता पुरस्कार तसेच कर्मचारी व माजी कर्मचाऱ्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला. गांधीसागर येथील शिक्षक सहकारी बँकेच्या सभागृहात आयोजित या कार्यक्रमाला माजी महापौर दयाशंकर तिवारी, बँकेचे अध्यक्ष ईश्वर मेश्राम, उपाध्यक्ष बाबाराव श्रीखंडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
ना. नितीन गडकरी म्हणाले, ‘कर्मचाऱ्यांनी कर्मचाऱ्यांच्या विकासासाठी ९० वर्षांपूर्वी क्रेडिट सोसायटीची स्थापना केली होती. पुढे या सोसायटीचे बँकेत रुपांतर झाले. बँक निरंतर प्रगतीच करीत आहे. बँकेच्या हितासाठी सहकारी चळवळीतील लोकांची भूमिका खूप महत्त्वाची असते. बँकेने या प्रवासात अनेक अडचणींचा सामना केला, पण तरीही येथील कर्मचाऱ्यांच्या योगदानामुळे कायम प्रगती होत राहिली.’ पुढील काही वर्षांमध्ये बँक शंभर वर्षांची होईल. या काळात अनेक लोक संस्थेत आले, अनेक लोक बाहेर पडले. पण प्रत्येकाने बँकेच्या प्रगतीसाठी काम केले, याचाही ना. गडकरी यांनी आवर्जून उल्लेख केला.
‘प्रदूषण रोखण्यासाठी योगदान द्या’
नागपूरमधील पर्यावरण चांगले ठेवण्यासाठी इलेक्ट्रिक वाहनांचा वापर करणे गरजेचे आहे. अशावेळी बँकेकडे एखाद्याने इलेक्ट्रिक वाहन घेण्याकरिता कर्जासाठी अर्ज केला, तर त्यांना कमी व्याजदरात ते उपलब्ध करून देत प्रदूषण रोखण्यासाठी योगदान द्यावे, असे आवाहन ना. नितीन गडकरी यांनी बँकेला केले.