नागपूर : दोन दिवसांच्या भेटीनंतर केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांचे आज नागपूरहून पुण्याकडे प्रस्थान झाले. उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस, आमदार चंद्रशेखर बावनकुळेही त्यांच्यासोबत पुण्यासाठी रवाना झाले.
विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी, जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटणकर, पोलीस आयुक्त अमितेश कुमार, नागपूर महानगर पालिकेचे आयुक्त राधाकृष्ण बी, ग्रामीण पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी गृहमंत्र्यांना येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर निरोप दिला.
शुक्रवारी रात्री अमित शाह यांचे नागपूर शहरात आगमन झाले. आगमनानंतर त्यांनी फुटाळा तलावावरील जगप्रसिद्ध ‘लाईट अँड फाऊंटेन शो ‘ ला उपस्थिती लावली.
शनिवारी त्यांनी पवित्र दीक्षाभूमी येथे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थिकलशाचे दर्शन घेतले. त्यानंतर रेशीम बागेतील स्मृती भवनासही त्यांनी भेट दिली. लोकमत वृत्तपत्राच्या सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमात मुख्य अतिथी म्हणून ते सहभागी झाले.
दुपारी त्यांचे सीमा सुरक्षा दलाच्या विशेष विमानाने पुण्याकडे प्रयाण झाले.